राहुल गायकवाड
बालेवाडी हाय स्ट्रीट भागातून ज्या 4 वर्षीय स्वर्णवचे (डुग्गू ) अपहरण करण्यात आलं होतं, तो आठ दिवसांनंतर सापडला आहे. सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी ही माहिती दिली.
गेल्या आठ दिवसात हा मुलगा कुठे होता, नेमकं काय झालं याची माहिती पोलीस थोड्याच वेळात देतील असे शिसवे यांनी सांगितले.
मुलगा कसा सापडला याबाबत मुलाच्या वडिलांनी बीबीसीला माहिती दिली.
"2 ते 2.30 च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने फोन करून तुमचा मुलगा पुनावळे जवळ कोणीतरी सोडून गेल्याचं सांगितलं. पुनावळे येथील पुलाजवळ एका वॉचमनच्या इथे मुलगा मिळून आला.
"त्याची तब्येत व्यवस्थित असून त्याला कुठलीही इजा झाली नाही आम्ही त्याला घरी घेऊन जात आहोत," अशी माहिती स्वर्णव डुग्गूचे वडील सतिश चव्हाण यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
11 जानेवारीच्या सकाळी पुण्यातल्या हायप्रोफाइल समाजल्या जाणाऱ्या बालेवाडी हाय स्ट्रीट भागातून 4 वर्षांच्या मुलाचं एका दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने अपहरण केलं होतं.
गेल्या आठ दिवसांपासून या घटनेचा पोलीस तपास करत होते आज त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
ही घटना घडल्यानंतर त्या मुलाबाबतच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. अनेकांनी त्या मुलाची कोणाला माहिती मिळाल्यास त्याच्या वडिलांना संपर्क करण्याची विनंती केली होती. त्या मुलाच्या वडिलांनी देखील अनेक पोस्ट लिहून मुलाला शोधून देण्याची विनंती केली होती.
मंगळवारी (18 जानेवारी) सकाळी देखील एक फेसबुक पोस्ट लिहीत अद्याप मुलाची माहिती मिळाली नसल्याचं त्याच्या वडिलांनी म्हटलं होतं. सोमवारी देखील त्यांनी एक पोस्ट लिहिली होती त्यात "तुम्हाला हवं ते देऊ पण आमचा मुलगा परत द्या," अशी भावनिक साद मुलाच्या वडिलांनी अपहरणकर्त्यांना घातली होती.
नेमकं काय घडलं होतं?
आठ दिवस झाले तरी मुलाचा शोध लागत नव्हता त्यामुळे बीबीसी मराठीने घटनास्थळी जाऊन आढावा घेतला होता.
बालेवाडी हाय स्ट्रीट पुण्यातला एक महत्त्वाचा भाग. अनेक मोठमोठ्या आयटी कंपन्या, हॉटेल आणि रहिवासी इमारतींचा हा भाग. थोड्याच अंतरावर मुंबई पुणे महामार्ग सुद्धा आहे. हॉटेल आणि आयटी कंपन्यांमुळे या भागात नेहमीच वर्दळ असते.
या भागातच पोलीस चौकी असल्याने पोलिसांचं पेट्रोलिंग सुद्धा सुरू असतं. आम्ही जेव्हा त्या भागात गेलो तेव्हा देखील एक पोलिसांची व्हॅन त्या भागात पेट्रोलिंग करताना आढळून आली होती.
घटनास्थळाच्या जवळच एक पान टपरी होती. घटना घडली तेव्हा टपरीचालक तेथेच होता. त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली होती.
11 जानेवारीच्या सकाळी 9 च्या सुमारास त्या टपरीवाल्याने नुकतीच त्याची टपरी सुरू केली होती. नेहमीची पूजा करून त्याने कामाला सुरुवात केली होती. साधारण 9.40 च्या सुमारास त्याच्या टपरीपासून काही अंतरावर अपहरणाची घटना घडली.
"मी सकाळी नुकतीच टपरी सुरू केली होती. त्यानंतर काही वेळातच ही घटना घडली. माझ्या टपरीपासून काही अंतरावरच त्या मुलाचं अपहरण झालं. अपहरण झालं तेव्हा त्या लहान मुलासोबत एक साधारण 12-13 वर्षाचा मुलगा होता. त्याने घरी जाऊन घटना सांगितली आणि मग त्या मुलाच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली," टपरीवरीवाला सांगत होता.
घटनास्थळाजवळच एक चहाचा ठेला सुद्धा होता. त्या चहाच्या ठेल्यावरुन काही माहिती मिळतेय का हे जाणून घेण्याचा देखील आम्ही प्रयत्न केला. घटना घडली तेव्हा तो चहावाला देखील तेथेच होता. अपहरण घटनेची माहिती त्याच दिवशी कळाल्याचं त्यानं सांगितलं. परंतु जेव्हा अपहरणाची घटना पाहिली का याबाबत विचारलं असता त्याने बोलण्यास नकार दिला.
ज्या ठिकाणावरून अपहरण झालं त्याच्यापासून हाकेच्या अंतरावरच पोलीस चौकी आहे. आम्ही जेव्हा त्या भागात गेलो तेव्हा अनेक सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा त्या भागात असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी आठ दिवस घेतला शोध
आठ दिवसांनंतरही त्या मुलाचा शोध लागू शकला नव्हता त्यामुळे चिंतेचे वातावरण होते.
तपास सुरू असल्याचं पोलीस सांगत होते.
त्या मुलाचे फोटो आणि त्याची माहिती अनेक राजकारण्यांनी देखील त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली होती, अनेक व्हॉट्सअप ग्रूपवर देखील त्या मुलाची माहिती पाठवली जात होती.
काही सीसीटीव्ही कॅमेरांमध्ये एक व्यक्ती त्या मुलाला दुचाकीवरून घेऊन जात असल्याचं दिसलं होतं. परंतु ती व्यक्ती पुढे कुठे गेली? याबाबतची माहिती मिळू शकलेली नव्हती.
आठ दिवस उलटून खंडणीचा किंवा इतर मागणीसाठी अपहरणकर्त्याचा फोन न आल्याने या घटनेचे गूढ अधिक वाढलं होतं पण मुलगा सापडला त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
घटनेची गोपनीयता आवश्यक
अशा घटनांमध्ये गोपनीयता राखणे अत्यंत आवश्यक असते असे याआधी पोलिसांनी सांगितले होते.
पोलिसांच्या तपासासाठी ही महत्त्वाची गोष्ट असल्याचं असे मत पुण्यातील माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं होतं.
बर्गे पुणे पोलीस दलात अनेक वर्षं गुन्हे विभागात कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी दहशतवादी विरोधी पथकात देखील काम केलं होतं, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
याआधी बर्गे म्हणाले होते, ''खंडणीसाठी, मुलांना भीक मागण्यास वापरण्यासाठी मुलांच अपहरण केलं जातं. काही घटनांमध्ये एखाद्याला मूल नसेल, तरी देखील अपहरण केलं जातं. पोलीस तंत्रज्ञाचा वापर करुन अशा घटनांचा शोध लावतात. काही केसेसमध्ये मुलं अनेक वर्षं सापडलेली नाहीत. तीर्थक्षेत्रांच्या इथे अशा मुलांचा शोध घेतला जाऊ शकतो त्याचबरोबर झोपडपट्ट्यांमध्ये कोंबिंग ऑपरेशन सुद्धा केलं जाऊ शकतं. अशा केसेसमध्ये पोलीस अधिक लक्ष देऊन आणि काळजी घेऊन तपास करतात."
मुलाची माहिती देण्यासाठी मागितली दोन लाखांची खंडणी
बालेवाडी येथील या अपहरणाप्रकणामध्ये सोशल मीडियावर अनेकांनी अपहरण झालेल्या मुलाची माहिती शेअर केली होती. याचाच फायदा घेत अपहरण झालेल्या मुलाच्या वडिलांना फोन करुन तुमच्या मुलाची माहिती देतो, असं सांगत दोन लाख रुपयांची मागणी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
अक्षय हनुमंत शिर्के ( वय 27. रा. आळंदवाडी ता. भोर ) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.
अपहरण झालेल्या मुलाची माहिती मिळावी यासाठी त्या मुलाच्या पालकांनी सोशल मीडियावर माहिती दिली होती. त्यावरून अक्षय याने मुलाच्या वडिलांना फोन करून मुलाची माहिती देतो असं सांगत दोन लाखांची मागणी केली. मुलाच्या पालकांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी अक्षयचा शोध घेतला. तेव्हा तो भोरमध्ये असल्याचे कळालं.
पोलिसांच्या पथकाने त्याला तेथून ताब्यात घेतलं. त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याच्याकडे कुठलिही माहिती नव्हती. केवळ सोशल मीडियावरील पोस्ट वाचून पैसे उकळण्यासाठी त्याने प्लॅन रचला होता. पोलिसांनी त्याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.