रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 2 जुलै 2022 (19:47 IST)

शरद पवारांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेवर बंदी; पवार म्हणाले...

sharad panwar
राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळून काही दिवस उलटत नाही तोच शरद पवारांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र कुस्तिगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे.
 
महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार यांचे वर्चस्व आहे. दरम्यान, या वर्चस्वाला धक्का देताना भारतीय कुस्ती संघटनेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
 
पवारांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र कुस्तिगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कुस्ती संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारणसभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
 
यासंदर्भांत शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
 
शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडलेले मुद्दे-
* कोणत्याही राज्य संघाच्या बाबतीत तक्रारी असू शकतात. त्या नजरेत आणून दिल्या जाऊ शकतात. पण तसं न करता जर कारवाई केली तर त्या संदर्भात वाद होऊ शकतो.
* आता जी कारवाई केलेली आहे, महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेला काही नोटीस नव्हती. त्यासंदर्भांत काही स्पष्टीकरण देखील मागितलेलं नव्हतं
* मी संघटनेचा अध्यक्ष आहे. खेळाडूंची निवड वगैरे बाबींपासून मी लांब राहतो. बीसीसीआयचा अध्यक्ष असताना पण मी असंच केलं होत.
* या संघटनांचे काही प्रश्न असतात. ते शासकीय यंत्रणांशी निगडीत असतात. जसं की मैदान हवं अहे, निधी उपलब्ध करून देणं आहे.
* खेळाडूंना मैदान मिळवणं इतकं सोपं नाही. जे कदाचित माझ्यासाठी असू शकतं. या सुविधा देणं, खेळाडूंना मदत करणं, त्यांचे प्रश्न सोडवायला हातभार लावणे हे माझं क्षेत्र आहे
* कुस्तीगीर परिषदेत, राष्ट्रीय स्पर्धा, राज्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात मदत करणं हे माझं काम आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या संदर्भात काही तक्रारी पुणे जिल्ह्यातून आल्या. काही राष्ट्रीय परिषदेकडे गेल्या. त्या संदर्भात काय उपाययोजना करण्यात आल्या याची मला अद्याप माहिती नाही.
* राष्ट्रीय परिषदेकडे काही विचारणा केली की तुम्ही अशी कारवाई का केली? त्यात असं समोर आलं की महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या कार्यवाही संदर्भात त्यांच्याकडे काही तक्रारी होत्या. तसंच काही स्पर्धा घ्यायच्या होत्या तसं झालं नाही.
* यात काही राजकारण नाही. माझ्यासारखे अनेक लोकं क्रिडा संघटनेत आहेत. आम्ही त्यात राजकारण आणत नाही.