मोठा निर्णय, पुण्यासाठी 1000 कोटी रुपयांचा निधी मंजूर
राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेत 1000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुण्यातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून पुरवणी अंदाजपत्रकात एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येत्या मार्चपर्यंत ही तरतूद खर्ची करा, असे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी एमएसआरडीसी दिले आहेत. त्यामुळे रिंगरोडसाठीच्या भूसंपादनाच्या कामास लवकर सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या रिंगरोडचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे. या रिंगरोडचे पूर्व आणि पश्चिम असे दोन टप्पे आहेत. पूर्व रिंगरोड हा मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यातून जाणार आहे. तर पश्चिम रिंगरोडला केळवडेपासून सुरुवात होणार असून हवेली, मुळशी आणि मावळ येथील उर्से टोलनाका येथे एकत्र येणार आहे.