गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 13 फेब्रुवारी 2022 (15:13 IST)

भाजपचे पुणे शहराध्यक्षसह 300 जणांवर गुन्हा दाखल

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या सत्काराला मर्यादित लोकांनाच परवानगी दिली असताना मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना जमवून, धक्काबुकी करून गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपच्या शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक आणि भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह 300 जणांवर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर भाजपच्या वतीने शनिवारी किरीट सोमय्या यांचा पुणे महानगरपालिकेत सत्कार करण्यात आला. कोणत्याही कार्यक्रमासाठी मर्यादित लोकांची उपस्थिती असावी अशी सूचना पोलिसांकडून देण्यात आली असून या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकतें जमले होते. धक्काबुक्कीत पोलिसांना किरकोळ इजा झाली तर काही पोलिसांच्या ड्रेसवरील नेमप्लेट तुटल्या. या प्रकरणी पोलिसांनी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक दीपक पोटे, राजेश येनपुरे, पदाधिकारी बापू मानकर, धनंजय जाधव, दत्ता खाडे, गणेश घोष, प्रतीक देसरडा यांच्या सह 300 जणांवर पोलीस उपनिरीक्षक यांनी तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.