बुधवार, 19 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (22:05 IST)

राहुल बजाज: वर्ध्यातल्या बजाज कुटुंबाने फॅक्टरी टाकायला पुणे का निवडलं?

Rahul Bajaj: Why did the Bajaj family from Wardha choose Pune to set up a factory? Marathi Pune News  IN Webdunia Marathi
ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं वर्धा जिल्ह्याशी अत्यंत जिव्हाळ्याच नातं होतं. राहुल बजाज यांचं बालपण वर्ध्यात गेलं. शहरातील बजाज वाडीत त्यांचं घर आहे. संपूर्ण कुटुंबासह ते तिथे राहायचे. त्यांना उच्च शिक्षणासाठी हार्वर्ड युनिव्हर्सिटीला जावं लागलं. मात्र वर्धा जिल्ह्याशी असणारा त्यांचा ऋणानुबंध अखेरपर्यंत कायम राहिला.
 
बजाज कुटुंबाशी भारत महोदय यांचे तीन पिढ्यांपासून कौटुंबिक सबंध होते. महोदय गांधी विचार परिषदचे सचिव म्हणून काम बघत आहेत. राहुल बजाज हे त्यावेळी त्या परिषदेत विश्वस्त होते.
 
त्या जुन्या आठवणींना उजाळा देत महोदय सांगतात, "ते माझ्यापेक्षा जवळपास 12 वर्षांनी मोठे होते. त्यामुळं बालपणीच्या आठवणी तेवढ्या सांगता येणार नाही. पण ते प्रत्येक दिवाळीला ते वर्ध्याला नित्यनियमाने यायचे. संपूर्ण कुटुंबांनी दिवाळीला वर्ध्यात हजेरी लावावी असा पायांडाच त्यांनी पाडला होता."
 
"ते जेव्हाही यायचे, तेव्हा कुटुंब आणि मित्रपरिवाराशी सबंधित असलेल्या लोकांना ते स्नेहभोजही द्यायचे. अलीकडे प्रकृती खालावत गेली, त्यामुळे तीन ते चार वर्षांपासून वर्ध्यात आले नाही. यातून राहुल बजाज यांची वर्धा आणि वर्ध्याच्या जनतेबद्दलची आत्मियता समजून येते," असं महोदय सांगतात.
बजाज आणि गांधी घराण्यात जवळच नातं होतं. महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमासाठीही जमनालाल बजाज यांनीच जागा दान केली होती, अस महोदय सांगतात. किंबहुना जमनालाल बजाज यांच्या आमंत्रणामुळे गांधी वर्धा/सेवाग्रामला आले.
पुढे बोलताना ते सांगतात, "पूर्वी सेवाग्राम हे शेगाव या नावाने ओळखलं जायचं. तिथे जमनानाल बजाज यांची जागा होती. मुळात आश्रमाच अस्तित्व हे जमनालाल बजाज यांच्यामुळे उदयास आले अस म्हटल्यास वावगं ठरणार नाही. पूर्वी आश्रम अशी संकल्पना नव्हतीच. सुरुवातीला निवास इतकंच होतं, पण कालांतराने इतर कुटी उभारल्या गेल्या. बजाज आणि गांधी परिवाराचे संबंध राहुल बजाज यांनी जपले. राहुल बजाज यांनी जेव्हा जेव्हा आवश्यकता पडली, तेव्हा तेव्हा सेवाग्राम आश्रमाला सढळ हाताने मदत केली".
 
वर्ध्यातल्या बजाज कुटुंबाने फॅक्टरी टाकायला पुणे का निवडलं?
बजाज यांच्याविषयी एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे. बजाज यांनी वर्ध्यात फॅक्टरी टाकायची होती. पण सेवाग्राम आश्रमामूळे ते शक्य होऊ शकलं नाही. मात्र हा किस्सा चुकीचा असल्याचे महोदय यांचे म्हणणे आहे.
 
ते म्हणतात, "इतिहासात याचे कुठलेही पुरावे नाहीत. बजाज एक व्यावसायिक उद्योगपती होते. उद्योग कुठे टाकायचा कुठे, तो यशस्वी होईल याची जाण त्यांना होती. एखादा उद्योग सुरु करताना, उभारणीसाठी, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था या गोष्टीचा विचार केला जातो. त्यामुळं बजाज यांनी फॅक्टरी पुण्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला असावा."
 
राहुल बजाज यांच्या मृत्यूने बजाज कुटूंबाचा आधारवड गेला असल्याची प्रतिक्रिया त्यांचे चुलत बंधू गौतम बजाज यांनी दिली. ते विनोबा भावे यांच्या पवनार आश्रमात राहतात.
 
बीबीसी सोबत बोलताना ते म्हणाले, "वयाने जवळपास आम्ही दोघेही सारखेच होतो. बालपणी त्यांच्याशी आमचा चांगले सबंध होते. अत्यंत निर्भय असणारा व्यक्ती होता. याचा अर्थ ते उर्मट होते असा नाही. माझा त्यांच्याशी त्यांच्या भावापेक्षाही जवळचा संबंध होता".
पण व्यापाराची सुरुवात त्यांना वर्ध्यातून करायची होती. पुण्यात असणारा कारखाना वर्ध्यात उभारायचा होता, यावर बोलताना गौतम बजाज म्हणाले, "आश्रमाचा आणि कारखान्याचा तसा काहीही सबंध नाही. एक उद्योजक म्हणून पायाभूत सुविधा देखील बघाव्या लागतात. फक्त मी वर्ध्याचा आहे, म्हणून कारखाना वर्धा जिल्ह्यात सुरू करणार असं म्हटल्याने होत नाही. त्यांचा आश्रमाशी जवळचा संबंध होता. पण उद्योग आणि आश्रम या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या त्यांनी जपल्या होत्या".
 
वर्ध्यावर विशेष प्रेम
महोदय यांनी राहुल बजाज यांच्याबद्दल एक किस्सा सांगितलला. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या आहेत, असं राहुल बजाज नेहमी आपल्या भाषणात सांगायचे.
एक म्हणजे मेहनत, राहुल बजाज यांनी आपल्या आयुष्यात खूप मेहनत केली. त्यांची कार्यालयात येण्याचा वेळ नक्की नसला, तरी ते कायम उशिरा जायचे.
 
दुसरी बाब म्हणजे जमनालाल बजाज यांची पुण्याई आणि तिसरी गोष्ट सांगताना ते बोट वर करायचे म्हणजे उपरवाले की कृपा.
 
राहुल बजाज यांचं वर्ध्यावर प्रेम होत, त्यामुळे बजाज उद्योहसमूह त्यांचा सर्वाधिक सीएसआर फंड वर्ध्यात खर्च करतात. सर्व सामाजिक आणि शैक्षणिक कामाचा पसारा वर्ध्यात पसरला आहे, असंही महोदय सांगतात .
 
राहुल बजाज यांच्यानंतर वर्ध्याचे ऋणानुबंध त्यांची पुढची पिढी कितपत जपेल माहिती नाही. मात्र बजाज कुटुंबाचे मूळ वर्ध्यात आहे. हे मात्र शंभर टक्के खरं आहे.