देहू रोड : शाळकरी मुलीचा दारूचे फुगे विकतानाचा व्हिडीओ व्हायरल
पुण्याच्या मावळ तालुक्यातील देहूरोड मध्ये दारूचे फुगे विकणाऱ्या एका शाळकरी मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याच्या देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सुजाण नागरिकाच्या सजगतेमुळे हातभट्टी दारूचा पर्दाफाश करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाळेच्या गणवेशात एक विद्यार्थिनी दारूचे फुगे विकत होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे देहूरोड पोलीस प्रशासनाला खडबडून जाग आली आहे.
देहू रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बरेच अवैध गावठी दारुचे अड्डे आहेत. असं असून देखील देहूरोड पोलीस केवळ बघत आहे. अशा परिस्थितीत आता या शाळकरी मुलीचा दारूचे फुगे विकतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ मध्ये एक मुलगी शाळेचा गणवेश घातलेली असून पिशव्यांमध्ये पॅक केलेली दारू काही तरुणांना देत आहे. या देहू परिसरात असलेले अवैध दारूचे अड्डे बंद होतील अशी अपेक्षा इथल्या नागरिकांना होती. मात्र तसे झाले नाही म्हणून इथे राहणारे श्रीजित रमेशन नावाच्या सुजाण नागरिकाने स्टिंग ऑपरेशन करून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. त्याच्यावर काय कारवाई आता पोलीस करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.