पूजा खेडकरच्या आईशी संबंधित इंजिनिअरिंग कंपनी मालमत्ता कर थकविल्यामुळे सील
ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होत असून पिंपरी- चिंचवड महापालिकेने शुक्रवारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांची तळवडे परिसरात असलेल्या थर्मोवेरिटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मालमत्ता कर न भरल्याने सील करण्यात आले असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या फर्मकडे दोन लाख रुपये मालमत्ता कराची थकबाकी होती. दोन वर्षांपासून ते जमा झाले नाही. सध्या पूजाची आई एका गुन्हेगारी प्रकरणात पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. मुळशी तालुक्यातील धडवली गावात जमिनीच्या वादातून एका तरुणाला पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणी पूजाची आई मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी अटक केली.
नागरी सेवांमध्ये निवड करताना कोटा मिळावा यासाठी पूजा खेडकर हिने पिपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात अपंगत्व प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. त्यात तिने आपला स्थानिक पत्ता म्हणून अभियांत्रिकी फर्मची माहिती दिली होती.
फर्मकडे 2022-2023 आणि 2023-2024 या वर्षातील मालमत्ता कराची थकबाकी आहे. याशिवाय कंपनीने चालू वर्षाची थकबाकीही जमा केलेली नाही. या फर्मला 2023 मध्ये थकबाकी न भरल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर पहिली कारवाई म्हणून फर्मचे पाणी कनेक्शन तोडण्यात आले. त्यानंतरही कर न भरल्याने मालमत्ता सील करण्यात आली आहे. फर्मची गेल्या दोन वर्षांची थकबाकी 1.96 लाख रुपये आहे. या वर्षीची थकबाकी जोडल्यानंतर ही रक्कम 2.77 लाख रुपये होते.
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) 2023 बॅचची अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर अलीकडेच पुण्यातील प्रशिक्षणादरम्यान नागरी सेवांमध्ये निवडीसाठी विशेषाधिकारांचा गैरवापर आणि बनावट प्रमाणपत्रे वापरल्याचा आरोप करण्यात आला होता.
Edited by - Priya Dixit