बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (08:29 IST)

शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त डी. एच. इनामदार यांचे निधन

शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त दास हणमंत तथा डी. एच. इनामदार (93) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. शनिवारी (दि.23) रात्री महेशनगर येथे राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नामवंत औषध वितरक शशांक इनामदार यांचे ते वडील होत. लिंक रोड, चिंचवड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

डी. एच. इनामदार यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, सून, जावई, नातवंडे व पतवंडे असा परिवार आहे.डी. एच. इनामदार यांचा जन्म कलेढोण, ता. खटाव, जि. सातारा येथे झाला. साता-यातील औंध संस्थानात त्यांचे शिक्षण झाले. नोकरीच्या निमित्ताने इनामदार पिंपरी-चिंचवडमध्ये आले. हिंदुस्थान अँटिबायोटिक्स मध्ये 32 वर्षे सेवा केली. आरोग्य व वैद्यकीय विभागाचे प्रशासन अधिकारी म्हणून ते निवृत्त झाले.

1999 ते 2005 या काळात ते श्री साईबाबा संस्थान, शिर्डीचे विश्वस्त होते. साई सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून साईभक्ती प्रचार व प्रसाराचे काम त्यांनी केले. साईबाबा पालखी सोहळ्यात ते मार्गदर्शन करीत. दरवर्षी साई चरित्र पारायणाचे आयोजन करीत. चऱ्होली येथे झालेल्या साई भक्तांचे महाधिवेशन आयोजित करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.