मेट्रोच्या प्रवाशांसाठी खूषखबर; मेट्रोचे डबे इटलीवरून पुण्याच्या सीमेवर
पुणे मेट्रो प्रकल्पासाठीचे कोच इटलीवरून बुधवारी मुंबईत पोचले. गुरुवारी ते पुण्यात पोचणार असून, त्यांची पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अल्पावधीत ट्रायल होणार आहे. नवरात्राच्या मुहूर्तावर महामेट्रोने दोन्ही शहरातील प्रवाशांना खूषखबर दिली आहे.
पुणे मेट्रोसाठी ३४ मेट्रो ट्रेनची ऑर्डर टिटागढ फिरेमा या कंपनीला देण्यात आली आहे. प्रत्येक ट्रेन मध्ये ३ कोच असणार आहेत. त्यामुळे टिटागढ फिरेमा हि कंपनी १०२ कोच पुणे मेट्रोसाठी बनवुन पुरवठा करणार आहेत. मेट्रोशी झालेल्या करारानुसार पहिल्या काही ट्रेन ह्या टिटागढ फिरेमाच्या इटली येथील कारखान्यामध्ये तयार होणार आहेत. व उर्वरित ट्रेन कोलकत्ता येथे तयार होणार आहेत. आज दि. ०६.१०.२०२१ रोजी इटलीत तयार झालेली पहिली ट्रेन (३ कोच असलेली) मुंबई बंदरात दाखल झाली आहे. समुद्रमार्गे आलेली ट्रेन जहाजावरुन उतरवून ट्रक वर लादण्यात आल्या आहेत. कस्टम आणि इतर बाबींची पुर्तता केल्यानंतर ट्रेन लवकरच पुण्यात दाखल होणार आहेत.