आयसीएसई दहावी परीक्षेत पुण्यातील हरगुन कौर मथारू देशात प्रथम
पुण्यातील सेंट मेरीज हायस्कूलमधील हरगुन मथारू ही देशात पहिली आली आहे. राज्याचा निकाल शंभर टक्के तर देशाचा निकाल 99.97 टक्के लागला आहे. आयसीएसईचा निकाल रविवारी सायंकाळी जाहीर झाला. या परीक्षेत हरगुन हिच्यासह कानपूर येथील अनिका गुप्ता, कनिष्का मित्तल आणि बाळारामपूर येथील पुष्कर त्रिपाठी हेदेखील देशात प्रथम आले आहेत.
या सर्वाना पाचशेपैकी 499 गुण मिळाले आहेत. देशातील 109 विद्यार्थी पहिल्या तीन स्थानांवर म्हणजे 497 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत.
दरवर्षी साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणारा या परीक्षेचा निकाल यंदा जवळपास एक महिना लांबला. यंदा मंडळाने सत्र पद्धत लागू करून परीक्षा घेतली होती. दोन्ही सत्रांना समान महत्त्व देऊन अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेला राज्यातील 26 हजार 83 विद्यार्थी बसले होते. त्यातील अवघा एक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे. देशातील 2लाख 31 हजार 63 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील 2 लाख 31 हजार 63 म्हणजे 99.97 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.