पिंपरीत मोबाइल हिसकावण्याच्या घटना वाढल्या
पिंपरीत सध्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. शहरात मोबाइल हिसकावून आणि घरातून चोरी केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये १५ गुन्हे दाखल झाले. मंगळवारी दुपारी दुचाकीस्वार चोरट्यांनी मोबाईल हिसकावून नेल्याचे दोन प्रकार घडले आहेत. या प्रकरणी दिघी आणि चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात चोरीचे तब्बल 15 गुन्हे विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत.
शहरातील नागरिकांच्या हातातून मोबाईल हिसकावून नेण्याचे प्रकार उघडकीस येत असून त्याबाबत विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे देखील दाखल होत आहेत. पोलिसांनी काही गुन्ह्यांची उकल करून त्यातील चोरट्यांना पकडले. मात्र तरीही मोबाईल चोरीचे तसेच वाहनचोरीचे सत्र शहरात सुरूच आहेत. रविवारी देखील तीन गुन्हे दाखल झाले. त्यामुळे मोबाईलधारक धास्तावले आहेत.
सागर भागवत बोरले यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बोरले हे कंपनीच्या पिकअप पॉइंटवर बसची वाट पाहत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी बोरले यांच्या हातातील १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. तर अक्षय मोहन धावणे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धावणे हे रस्त्यावर थांबले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील पाच हजार रुपयांचा मोबाईल हिसका मारून नेला.
जुन्या मोबाईलला शहरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. याचा गैरफायदा घेऊन चोरीचे मोबाईल विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.