पुणे पालिकेला मिळकतकरातून एक हजार कोटीचे उत्पन्न
पुणेकरांनी गेल्या पाच महिन्यांमध्ये एक हजार कोटींचा मिळकत कर महापालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितही महापालिकेला मोठे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी पुणेकरांनी करोना संकटातही मोठ्या प्रमाणात मिळकतर भरला. त्यामुळे यंदा कर वेळेत भरणाऱ्या निवासी मिळकतींना सरसकट 15 टक्के सवलत दिली होती. त्यामुळे यावर्षी 31 जूनपर्यंत कर भरून सवलत घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. ही सवलत घेणाऱ्या करदात्यांकडून सुमारे 303 कोटींचा कर भरला असून त्यांना आतापर्यंत 50 कोटी रुपयांची सवलत दिली आहे.
याशिवाय, व्यावसायिक मिळकतकर भरणाऱ्यांकडूनही यंदा मोठ्या प्रमाणात कर भरण्यात आला असून त्यांच्याकडून 5 ते 10 टक्के सर्वसाधारण करात असलेल्या सवलतीचा लाभ घेत सुमारे 497 कोटींचा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. करोनाच्या आपत्तीत अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न घटत असताना पुणेकरांनी दाखविलेल्या विश्वासामुळे हे उद्दिष्ट साध्य करता आले. महापालिकेला गेल्या पाच महिन्यांत सुमारे 2800 कोटी रुपये विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. या आर्थिक वर्षासाठी आम्ही सादर केलेल्या अर्थसंकल्पाप्रमाणे आम्ही 8370 कोटी रुपयांचे उदिष्ट गाठण्याचा प्रयत्न आहे, असे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.