बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (15:26 IST)

रिक्षाचालकांच्या अडचणींत वाढ, रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल; काय आहे नेमके कारण

auto rickshaw
पुणे : बाईक टॅक्सीविरोधामध्ये पुण्यातील रिक्षा चालकांनी बेमूदत आंदोलन पुकारले होते. मात्र प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. परंतु आता आंदोलक रिक्षाचालकांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.
 
अधिक माहितीनुसार, ‘बघतोय रिक्षावाला’ या संघटनेसह अनेक संघटना रिक्षा बंदच्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. सोमवारी (दि. 28) संघटनांनी हे आंदोलन मागे घेतले आहे. ‘बघतोय रिक्षावाला’संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी बेकायदेशीरपणे टॅक्सी चालवणाऱ्यांवर कारवाईसाठी समिती नेमण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. आंदोलन करणाऱ्या रिक्षा चालकांसमोर तशी याबद्दल घोषणा करण्यात आली होती. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
 
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानंतर येत्या १० दिवसामध्ये पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात येणार आहे. या समितीत जिल्हाधिकारी यांच्यासह आरटीओचे अधिकारी तसेच ट्रॅफिक पोलिस विभागाचे अधिकारी असतील. या समितीकडून येत्या १० दिवसामध्ये बेकायदा बाईक टॅक्सीवर कडक कारवाई केली जाणार आहे. परंतु आता आंदोलनामध्ये सहभागी २ हजार ५०० रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आली आहे.
 
विविध संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, बाबा कांबळे, यामध्ये केशव क्षीरसागर, आनंद अंकूश यांच्यावर बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतुकीस अडथळा, नियमभंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सोमवारी पुण्यामध्ये हजारो रिक्षा चालकांनी आरटीओ कार्यालयासमोर हे आंदोलन केले होते. कलम ३४१नुसार अडीच हजार रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor