शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022 (12:28 IST)

नर्सच्या प्रेमात पडला, जीवघेणे इंजेक्शन देऊन पत्नीचा जीव घेतला, रुग्णालयातील कर्मचाऱ्याला अटक

पुणे- पुण्यातील एका खासगी रुग्णालयात काम करणारा विवाहित व्यक्ती सोबत काम करत असलेल्या नर्सच्या प्रेमात पडला. तिच्याशी लग्न करण्यासाठी त्याने पत्नीला विषारी इंजेक्शन देऊन ठार केले.
 
रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या स्वप्नील सावंतचे एका सहकारी नर्सशी प्रेमसंबंध होते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे होते, म्हणून त्याने पत्नीची हत्या केल्याचे पौड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील सावंतने 5 महिन्यांपूर्वी प्रियंका क्षेत्रेसोबत लग्न केले होते. मुळशी तालुक्यातील कासार आंबोली गावात पती-पत्नी भाड्याच्या घरात राहत होते. सावंतने 14 नोव्हेंबर रोजी पत्नीला रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
 
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. हे संपूर्ण प्रकरण आत्महत्येचे ठरविण्यासाठी स्वप्नीलने शर्थीचे प्रयत्न केले. तो पोलिसांची दिशाभूल करत राहिला. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली.
 
घरातून एक सुसाईड नोटही पोलिसांना सापडली आहे. त्यावर प्रियांकाने स्वाक्षरी केली होती. या सुसाईड नोटचाही तपास सुरू आहे.

Edited by: Rupali Barve