शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (18:34 IST)

आंबा समुद्रमार्गे अमेरिकेत पोहोचला

hapus mango
पुणे : यंदा पहिल्यांदाच भारतीय आंबा समुद्रमार्गे अमेरिकेच्या बाजारपेठेत पोहोचला आहे. कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून समुद्रमार्गे जहाजातून 5 जूनला मुंबई येथून पाठविलेला आंबा अमेरिकेच्या बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाला आहे. आजवर केवळ हवाईमार्गे भारतीय आंबे अमेरिकेत जात होते. यंदा प्रथमच समुद्रमार्गे आंबे पाठविण्यात आले होते. 25 दिवसांचा प्रवास करून हे आंबे चांगल्या स्थितीत अमेरिकेत पोहोचले आहेत.
 
भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ (अपेडा) आणि मे. सानप ॲग्रो ॲनिमल्स प्रा. लि. यांच्या संयुक्त प्रयत्नाने यंदा प्रथमच अमेरिकेस समुद्रमार्गे आंबा निर्यात करण्यात आला होता. 5 जून रोजी मुंबईतून पाठविलेला आंब्याचा कंटेनर 30 जून रोजी अमेरिकेतील नेवार्क बंदरात दाखल झाला. हा कंटेनर 1 जुलै रोजी आयातदार मे. अनुसया प्रेश प्रा.लि. यांनी ताब्यात घेऊन उघडल्यानंतर कंटेनरमधील आंबा सुस्थितीत पोहोचल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पुढील हंगामापासून भारतीय आंबे समुद्रमार्गे अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसे झाल्यास आंबा उत्पादक शेतकरी, निर्यातदार आणि आयातदारांना फायदा होणार आहे.