शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जून 2022 (19:41 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी: अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे का?

ajit panwar
Prime Minister Narendra Modi: देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण झालं नाही. यावरून वादाला तोंड फुटलं आहे.
 
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असल्याने त्यांना बोलू द्यावं अशी विनंती पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली होती. पण पीएमओने त्याला काही उत्तर दिलं नाही. हे अतिशय वेदनादायी आणि अपमानकारक आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना न बोलू देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हे जे झालं ते अयोग्य आहे."
 
प्रोटोकॉलप्रमाणे अजित पवारांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणं बंधनकारक आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. पण त्यांना बोलू दिलं नाही.
 
देहू इथे झालेल्या या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाल्यानंतर सूत्रसंचालकांनी थेट पंतप्रधानांचे नाव पुकारले. ही बाब लक्षात आल्यानंतर पंतप्रधानांनी हाताने इशारा करत अजित पवारांना बोलावं असं सांगितलं. पण सूत्रसंचालकांनी नावच न पुकारल्याने अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर नरेंद्र मोदींचे भाषण झालं.
 
या कार्यक्रमाला राजशिष्टाचाराचा भाग म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. पंतप्रधानांच्या स्वागतापासून या कार्यक्रमाच्या समारोपापर्यंत अजित पवार उपस्थित होते.
 
राजशिष्टाचाराचा भाग म्हणून अजित पवार पंतप्रधानांच्या स्वागताला विमानतळावर उपस्थित होते. त्यानंतर ते कार्यक्रमालाही होते. देहू संस्थान कुठल्याही पक्षाचं नाही. अजित पवारांना जाणीवपूर्वक डावललं असेल तर तो महाराष्ट्राचा अपमान आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले.
 
"हा मुद्दा हास्यास्पद आणि बालिश वाटतो. अजितदादांना बोलायला दिलं असतं तर आनंदच झाला असता. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचं नियोजन असतं. या कार्यक्रमाच्या तपशीलाबाबत मला माहिती नाही. अजितदादा बोलले नाहीत म्हणजे महाराष्ट्राचा अपमान असं मानण्याचं कारण नाही. अजितदादा पंतप्रधानांच्या बाजूलाच होते. वारकऱ्यांचा सन्मान करण्यासाठीच पंतप्रधान मोदी आले होते. ते राजकीय कार्यक्रमासाठी आले नव्हते. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करू नये. पंतप्रधानांच्या फोटोवरून राजकारण केलं," असं भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
 
राजशिष्टाचार हा फक्त महाराष्ट्रानेच पाळायचा का? - राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
 
"देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेण्यासाठी आणि त्यांचे राज्याच्या वतीने स्वागत करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. अजितदादा पवार हे पुणे विमानतळावर हजर होते. राज्याच्या वतीने पंतप्रधानांचे त्यांनी स्वागत केले आणि देहू येथील कार्यक्रमात उपस्थित राहिले. हा राज्याचा राजशिष्टाचार मा.ना.अजितदादा पवार यांनी पाळला असून पंतप्रधान कार्यालयाने त्यांचा राजशिष्टाचार का पाळला नाही?" असं वरपे सांगतात.
 
"राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या पंतप्रधान कार्यालयाने नकार देणे हे कोणत्या पंतप्रधान कार्यालयाचा कोणत्या राजशिष्टाचारात बसते? मा. ना. अजितदादांच्या भाषणाला नकार देणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या अपमानाची परंपरा नरेंद्र मोदी कायम ठेवू पाहत आहेत काय?
 
"पंतप्रधान कार्यालयाच्या प्रोटोकॉलमध्ये बसत नसताना मा. देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले असून पंतप्रधान कार्यालयाच्या प्रोटोकॉलमध्ये बसत असताना मा. ना. अजितदादा पवार यांच्या देहू येथील भाषणाला पंतप्रधान कार्यालयाचा नकार हे राजकारण राज्यातील भाजपच्या सांगण्यावरून झाले असा माझा स्पष्ट आरोप आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाने आपली भूमिका जाहीर करावी," असं वरपे सांगतात.
 
भाषणाला दिल्लीतूनच परवानगी दिली नाही - देहू संस्थान
या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करताना देहूच्या मंदिर संस्थांनचे प्रमुख नितीन महाराज मोरे म्हणाले, "हा आमचा धार्मिक कार्यक्रम होता. पंतप्रधान मोदींना मुंबईत संध्याकाळी कार्यक्रम होता. त्यानुसार व्यासपीठावरील प्रोटोकॉल आम्हाला दिल्लीवरुन आले होते. त्यामध्ये संस्थानचा संबंध येत नाही. संस्थाननं हा कार्यक्रम संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी घेतला होता".
 
दोन महिन्यांपूर्वी काय घडलं होतं?
दोन महिन्यांपूर्वी पुण्यात मेट्रो मार्गाच्या अनावरणाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं. त्या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित होते. त्यावेळी अजित पवारांनी रोखठोक स्वभावाचा प्रत्यय घडवत टीका केली होती.
 
तेव्हा अजित पवार म्हणाले होते, "अलीकडे बरंच काही घडतं आहे. मला पंतप्रधानांना एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे. घटनात्मक पदावर विराजमान व्यक्तींकडून काही विनाकारण वक्तव्यं होत आहेत. ही वक्तव्यं महाराष्ट्राला आणि नागरिकांना पटणारी नाहीत. ती मान्यदेखील नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी, जिजाऊंनी कल्याणकारी राज्य निर्माण केलं. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशात स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. सत्यशोधक विचारांचा प्रसार केला. महामानवांचा वारसा पुढे घेऊन जायचा आहे. कोणाबद्दलही असूया न ठेवता विकासाचं राजकारण करायचं आहे".