गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जून 2022 (19:30 IST)

नरेंद्र मोदींनी देहू गावात मराठी अभंग म्हटले, पण ते मराठी कुठे आणि कसे शिकले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देहूत आहेत. त्यांनी आपल्या भाषणाला मराठीत सुरुवात केली. श्री विठ्ठलाय नमः असा जयघोष करत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या असं म्हणत त्यांनी उपस्थितांची मनं जिंकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात अनेक ठिकाणी ओव्या आणि अभंग म्हटले.
 
'जे का रंजले गांजले त्यासा म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा,' हा अभंग त्यांनी म्हटला.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याआधी अनेक वेळा मराठीत संवाद साधला आहे.
 
याधीही त्यांनी घरकुल योजनेत घर मिळालेल्या लाभार्थ्यांशी मराठीत संवाद साधला. 'नवीन घर मिळालं, काही मिठाई केली का? माझ्यासाठी पाठवणार का?', 'गृहप्रवेश केला का? पूजा केली का?' 'यावर्षी विशेष दसरा आला आहे तुमच्यासाठी,' पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिला लाभार्थ्यांशी मराठीत संवाद साधत होते.
 
तेव्हा अनेकांच्या मनात हा प्रश्न आला असेल- मोदी यांना मराठी कसं येतं? यामागे काय कारण असेल?
 
महाराष्ट्रात सलग फार काळ वास्तव्य न करताही ते मराठी समजू आणि बोलू शकतात, याचं कारण आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. त्यांना संघाच्या बालशाखेत आणणारी व्यक्तीसुद्धा मराठीच होती.
 
मोदींचे 'पालक पिता' मराठीच
"संघातर्फे बालशाखा सुरू केल्या जातात. गुजरातमध्ये अशा बालशाखा सुरू करण्याचे काम तत्कालीन प्रचारक काशीनाथ हे करत होते. ते मुळचे सातारा जिल्ह्यातील. साठच्या दशकात त्यांनीच नरेंद्र मोदी यांना संघाच्या शाखेत आणलं. पुढे चालून प्रचारक झाल्यानंतर लक्ष्मणराव इनामदार यांच्याकडून त्यांनी शिक्षा घेतली," अशी माहिती 'नरेंद्रायण' या पुस्तकाचे लेखक डॉ. गिरीष दाबके देतात.
सातारा जिल्ह्यातील खटावचे लक्ष्मणराव इनामदार यांना नरेंद्र मोदी गुरुस्थानी मानतात, असं संघातले नेते सांगतात. मोदी यांनी आज साताऱ्यातील महिला लाभार्थ्यांशी संवाद साधताना त्यांचा उल्लेख केला. 'हम उन्हें वकील साहब कहा करते थे,' असं मोदी यांनी सांगितलं.
 
"साठ सत्तरीच्या दशकात लक्ष्मणराव इनामदार हे गुजरातमध्ये प्रचारक होते. मोदी संघात सक्रिय झाल्यानंतर इनामदार यांनीच त्यांना दिशा देण्याचं काम केलं. मोदी यांच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांना वकील साहेब म्हटलं जायचं. संघामध्ये त्यांना त्यावेळेस मोदींचे पालक पिता समजलं जायचं," असं संघामध्ये नरेंद्र मोदी यांचे समकालीन सहकारी राहिलेले केशवराव नांदेडकर सांगतात.
 
भागवत कनेक्शन
"गुजरातमध्ये गायकवाडांचे राज्य होते. त्यामुळे तिकडे मराठी बोलली जायची. गुजरातमध्ये मोठ्याप्रमाणावर मराठी प्रचारक जायचे. सरसंघचालक मोहन भागवत यांचे वडील हे तत्कालीन प्रांतप्रचारक होते. यावरून तुम्ही कल्पना करू शकतात," नांदेडकर सांगतात.
 
साधारणतः चाळीसच्या दशकात सरसंघचालक मोहन भागवत यांचे वडील गुजरातमध्ये प्रचारक म्हणून गेले.
"संघाच्या दृष्टीने महाराष्ट्र आणि गुजरात हे वेगळं नाही. गुजरात राज्य नंतर निर्माण झालं. त्यामुळे व्हायचं काय की त्यावेळी गुजरातमध्ये संघाचे प्रचारक म्हणून जाणारे कार्यकर्ते हे बहुतांशकरून महाराष्ट्रातील आणि मराठी बोलणारे असायचे," असं दाबके सांगतात.
 
ते पुढे सांगतात, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 70च्या दशकात संघाचे प्रचारक झाले. त्यावेळेस त्यांचे बहुतांश सहकारी हे मराठीच होते. मोदींनी लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी या सहकाऱ्यांचा उल्लेख केला आहे. लक्ष्मणराव इनामदार, गजेंद्र गडकर यांची नावे ते घेतात."
 
शिक्षक मोदींच्या मराठीतून सूचना
भाजपचे नेते सुनील देवधर यांनी मोदींना मराठी येण्यामागे संघाचे वर्ग हे एक प्रमुख कारण असल्याचं सांगितलं.
 
ते म्हणतात, "संघाचा उदय महाराष्ट्रात झालेला असल्यानं संघात काम करणारी मराठी माणसं वेगवेगळ्या राज्यांत गेली. गुजरातमध्ये प्रचारक म्हणून काम करणारे मोठ्या संख्येने मराठीच होते. त्यांच्यात मराठीत संवाद साधला जायचा. मोदी हे संघाचे प्रचारक असल्याने त्यांचा मराठीशी सातत्याने संबंध येत होता. त्यामुळे त्यांना मराठी इतकी चांगली कळते. बोलता येते."

"संघाचे 20 दिवसांचं प्रशिक्षण वर्ग दरवर्षी भरवले जातात. द्वितीय वर्गामध्ये तीन चतुर्थांश महाराष्ट्रातील तर ऊर्वरित हे गुजरातमधले असायचे. नरेंद्र मोदी हे दरवर्षी प्रशिक्षण देण्यासाठी जायचे. शिक्षकाच्या भूमिकेत असताना सगळ्यांना सूचना करणं, आज्ञा देणं असं सगळं मराठीतूनच व्हायचं." मला आसामी येण्यामागे हे प्रशिक्षण वर्ग असल्याचं सांगायला ते विसरत नाही.
 
"संघांच प्रमुख कार्यालय नागपुरात आहे. त्यामुळे नागपूरशी प्रत्येक संघ कार्यकर्त्याचा संबध येतोच. मोदी हे नागपुरात यायचे. साहजिकच अशा सगळ्या गोष्टींमुळे त्यांना मराठी चांगलं येतं," असं डॉ. दाबके सांगतात.