मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जुलै 2022 (12:45 IST)

रिक्षाची भाडेवाढ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला

1ऑगस्टपासून पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आलेली रिक्षाची भाडेवाढ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही रिक्षा संघटनांनी आक्षेप घेतल्याने या भाडेवाढीला स्थगिती देण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि प्राधिकरणाचे सचिव डॉ. अजित शिंदे यांनी दिली.
 
सीएनजीच्या दरामध्ये गेल्या तीन महिन्यांमध्ये दहा रुपयांची वाढ झाली आहे. इंधनातील ही दरवाढ लक्षात घेता रिक्षाच्या भाड्यामध्ये वाढ देण्याची मागणी रिक्षा संघटनांकडून करण्यात आली होती. त्यावर प्राधिकरणाचे अध्यक्ष, जिल्ह्याधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.
पुण्यात प्रवासासाठी सर्वाधिक रिक्षाचा वापर केला जातो. किलोमीटर मागे 2 रुपयांनी वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसणार होती. मात्र, तूर्तास या दरवाढीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवस पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.

ऑटोरिक्षा भाडेसुधारणा करण्याचा निर्णय 25 जुलै रोजी झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणेच्या बैठकीत घेण्यात आला होता. पहिल्या दीड किमी अंतरासाठी किमान देय असलेल्या सद्याच्या 21 रूपये भाडेदरात सुधारणा करून सुधारित भाडेदर 23 रूपये व त्यापुढील प्रत्येक किमीसाठी देय भाडे 14 रूपयावरून 15 रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
 
मात्र, भाडेदरवाढीचा पुर्नविचार व्हावा, यासाठी विविध रिक्षा संघटना व प्रवासी संघटनांनी मागणी केली आहे. या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे 1ऑगस्टपासून लागू करण्यात येणारी ऑटोरिक्षा भाडेदरवाढ प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या पुढील बैठकीपर्यंत प्रलंबित ठेवण्यात आली आहे.