चिटफंड व्यावसायिकांचे अपहरण करून खून
पिंपरी येथील एका चिटफंड व्यावसायिकांचे अपहरण करून खून केला आहे. व्यवसायिकाचा महाडमध्ये मृतदेह आढळून आला आहे. आनंद साहेबराव उनावणे (वय- 45 रा. मोरवाडी, पिंपरी) असे खून झालेल्याचे नाव आहे. आनंद यांचे गुरुवारी (दि.4) राहत्या घरातून अपहरण करण्यात आले होते.
याप्रकरणी आनंद यांचे भाऊ विष्णू उनावणे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद उनावणे हे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू केला. त्यांचे मोबाईल टॉवर लोकेशन आणि कॉल डिटेल्स तपासत असताना नातेवाईकांकडून माहिती मिळाली, की एक अनोळखी मृतदेह महाड तेथे आढळून आला आहे.
महाड पोलिसांकडून मिळालेले फोटो आणि आनंद यांचे वर्णन मिळते जुळते होते. नातेवाईकांना घेऊन पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी गेले. त्यावेळी नातेवाईकांनी मृतदेह आनंद उनावणे यांचा असल्याचे सांगितले. अद्याप आनंद यांच्या फोनचे लोकेशन दुसरीकडे दाखवत असल्याचे पोलिसांनी सांगितले.