रविवार, 17 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जुलै 2024 (09:09 IST)

पूजा खेडकरच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाची होणार चौकशी, दिलीप-मनोरमा खेडकर खरंच विभक्त झाले होते?

पूजा खेडकरचे पालक दिलीप आणि मनोरमा खेडकर यांचा घटस्फोट झाला होता का याची चौकशी आता पुणे पोलिसांकडून केली जात आहे. केंद्राने दिलेल्या आदेशानुसार ही चौकशी सुरु करण्यात आली आहे.
 
आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण उघड झाले तेव्हा पूजा खेडकर यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. यात पालकांच्या उत्पन्नावरुन विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पूजा खेडकरने आपल्या पालकांचा घटस्फोट झाल्याचे सांगितले होते.
 
वडील आयएएस अधिकारी असले तरीही आपल्या पालकांचा घटस्फोट झालेला असल्याने उत्पन्न कमी असल्याचा दावा पूजा खेडकरने केला होता. याच्याच आधारे तिने नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र सादर केले होते.
 
पण पूजा खेडकरच्या पालकांचा खरंच घटस्फोट झाला आहे का असा प्रश्न उपस्थित झाला. याला कारणीभूत ठरले आहे ते दिलीप आणि मनोरमा खेडकर यांनी निवडणूक लढताना सादर केलेली माहिती. या कागदपत्रांच्या आधारे खेडकर दाम्पत्याचा घटस्फोट 2010 मध्ये झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
 
दिलीप खेडकरांनी अहमदनगरमधून वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी दिलीप खेडकर यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या घोषणापत्रात मनोरमा खेडकर यांचा उल्लेख पत्नी म्हणून केला आहे, तर मनोरमा खेडकर यांच्या घोषणापत्रात दिलीप खेडकरांचा उल्लेख पती म्हणून करण्यात आला आहे.
 
मनोरमा खेडकर यांनी या निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता, तर दिलीप खेडकरांनी निवडणूक लढवली होती.
 
घोषणापत्रात मनोरमा खेडकर यांनी 2018-19 मध्ये आयकर विवरणपत्रात दाखवलेले उत्पन्न 3,11,485 असल्याचं म्हटलं आहे, तर 2019-20 मध्ये 2,47,420 आणि 2021-22 मध्ये 1,54,490 असल्याचा उल्लेख आहे.
 
मनोरमा खेडकर यांच्या घोषणापत्रानुसार त्यांचे पती दिलीप कोंडीबा खेडकर यांचे 2021-22 मधील आयकर विवरणपत्रात दाखवलेले उत्पन्न आहे 13,58,290 रुपये तर 2022-23 मधले उत्पन्न आहे 43,59,230 रुपये. याशिवाय मालकीच्या असणाऱ्या इतर मालमत्तांचाही उल्लेख या घोषणापत्रात करण्यात आला
 
आहे.
 
यातील काही मालमत्ता वारसा हक्काने मिळाल्या आहेत, तर काही स्वतः संपादन केलेल्या असल्याचं म्हटलं आहे. त्यांचे उत्पन्न लक्षात घेऊन त्यांना नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र कसे मिळाले असा प्रश्न आता आम आदमी पक्षाचे नेते विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे.
 
बीबीसी मराठीशी बोलताना कुंभार यांनी म्हटलं की, "दिलीप आणि मनोरमा खेडकर या दोघांनीही गेल्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला
 
होता. यात त्यांनी एकमेकांचा उल्लेख हा पती-पत्नी म्हणून केला आहे. घटस्फोट झाला असेल तर 2024 मध्ये हा दावा कसा करण्यात आला हा प्रश्न आहे. तसेच जरी आपण असं गृहीत धरलं की पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांचा आणि दिलीप खेडकर यांचा घटस्फोट झाला होता तरी पूजा खेडकर यांना नॉन क्रिमी लेअरचे सर्टिफिकेट मिळू शकत नाही."
 
याबद्दल अधिक सांगताना कुंभार यांनी म्हटलं की, त्यांच्या घोषणापत्रानुसार त्यांच्याकडे 16 हजार स्क्वेअर मीटरच्या व्यावसायिक मालमत्ता असल्याचं दाखवलं आहे. तसेच नॅशनल सोसायटी इथे 45 लाखांचा 9 हजार स्क्वेअर फूटचा प्लॅाट आहे आणि 1.45 कोटींचा बंगला आहे. आधी त्यांनी आपली ओळख ही डॉक्टर अशी सांगितली, नंतर त्या स्वतःला शेतकरी म्हणवू लागल्या. मनोरमा खेडकर यांचे वडील आणि पती हे दोघंही क्लास वन अधिकारी होते. यामुळे त्यांना नॉन क्रिमी लेअर सर्टेफिकेट मिळू शकत नाही. यामुळे त्यांच्या घटस्फोटावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.”
 
केंद्र सरकारच्या आदेशावरुन आता या घटस्फोट प्रकरणात पोलिस चौकशी सुरु झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणात कोणताही गुन्हा मात्र अद्याप दाखल करण्यात आला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
 
आतापर्यंत काय घडलं?
पूजा खेडकर या 2023 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांना प्रशिक्षणार्ती अधिकारी म्हणून पुण्यात नियुक्ती मिळाली होती. यावेळी त्यांनी प्रशिक्षणाचे कामकाज समजून घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी रुजू होण्याआधीच विविध अवास्तव मागण्या करणे सुरु केले. यावरुन पुण्याचे जिल्हाधिकारीसुहास दिवसे यांनी लेखी तक्रार नोंदवली.
 
त्यानंतर त्यांची बदली वाशिममध्ये करण्यात आली. मात्र, त्यानंतरही अनेक मुद्दे समोर आल्यानंतर युपीएसीने त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला.
 
तसेच त्यांना लालबहादूर शास्त्री अकादमीमध्ये पुन्हा बोलावण्यात आले.
 
यूपीएससीमार्फत देण्यात आलेल्या प्रेस रिलीजमध्ये पूजा खेडकर यांच्या गैरप्रकारांची चौकशी पूर्ण झाली असून त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचं जाहीर केलं. त्यानंतर पूजा खेडकर यांनी मसूरीमध्ये अकादमीमध्ये जाणं अपेक्षित होतं. मात्र, पूजा खेडकर अजूनअकादमीत हजर झालेल्या नाहीत.