रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 14 फेब्रुवारी 2024 (09:14 IST)

पुणे :येरवडा कारागृहात कैद्याने उचललं टोकाचं पाऊल

पुणे शहरातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या एका कैद्याने कारागृहातील रुग्णालयात टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
 
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , मंगेश विठ्ठल भोर (वय ३०, रा. हिवरे, ता. जुन्नर, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. भोर याच्याविरुद्ध ओतूर पोलिस ठाण्यात एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
 
न्यायालयाने त्याची १६ जुलै २०२३ रोजी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. कैद्यांना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नाश्ता करण्यासाठी कारागृहाच्या आवारात सोडण्यात आले. तेथील मेडिकल स्टोअरच्या बाजूला मोकळ्या जागेत मंगेशने टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली.
 
ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्याला कारागृहातील रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. त्याच्यावर कारागृहात मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते. भोर याने यापूर्वी १९ जुलै रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Edited by -Ratnadeep Ranshoor