रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020 (10:28 IST)

जम्बो रुग्णालयात 50 ऑक्सिजन बेड तयार, नवीन कोरोना रुग्णांना प्रवेश सुरू

पुण्यातल्या जम्बो कोविड रुग्णालयात 50 ऑक्सिजन बेड तयार करून कार्यान्वित करण्यात आले आहेत. याशिवाय शुक्रवारी आणखी 25 ऑक्सिजन बेड, 5 आयसीयू, तर 5 व्हेंटिलेटर बेड तयार करण्यात येणार आहेत. यामुळे शुक्रवारी संध्याकाळपर्यंत एकूण 85 बेड तयार होतील. येथे नवीन रुग्णांना प्रवेश देण्यास सुरुवात करण्यात आली असून, चार रुग्णांना प्रवेश देण्यात आला. तसेच, ‘जम्बो’मध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या 14 रुग्णांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती अतिरिक्त मनपा आयुक्त व जम्बो सेंटरच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांनी दिली.
 
जम्बो कोविड रुग्णालयाची यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मंगळवारी (8 सप्टेंबर) पुणे महापालिका प्रशासनाच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांनी येथे भेट देऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी रुबल अग्रवाल ऑक्सिजन बेडची संख्या व रुग्णालयाची एकूण क्षमता वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे 50 ऑक्सिजन बेड कार्यान्वित करण्यात आले. मागील आठवड्यात 2 सप्टेंबरपासून नवीन रुग्णांना प्रवेश देण्यात आला नव्हता. मात्र, आता प्रवेश सुरू करण्यात आले आहेत.
 
त्याचबरोबर रुबल अग्रवाल यांनी सांगितले की, “या 50 बेड व्यतिरिक्त जम्बो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडसाठी आवश्यक ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन येथे लिक्विड ऑक्सिजनच्या दोन टाक्या तयार ठेवण्यात आल्या आहेत. एक 11 केएल आणि दुसरी 15 केएल ऑक्सिजनचा साठा असणारी अशा दोन टाक्या सुसज्ज करण्यात आली आहे.” जम्बोमध्ये बरे झालेल्या 20 रुग्णांना बुधवारी, तर 14 रुग्णांना गुरुवारी घरी सोडण्यात आले. ‘जम्बो’मध्ये उपचार घेऊन आतापर्यंत एकूण 66 रुग्ण बरे झाले आहेत.
 
उपचार घेत असलेल्या रुग्णांशी टॅब्लेट फोनद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपर्क करण्याची सुविधेचा लाभ नातेवाईक घेत आहेत. दिवसातून एकदा एका नातेवाईकाला रुग्णाशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधता येतो. या सुविधेबद्दल नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.