बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 15 ऑक्टोबर 2020 (15:44 IST)

पुणे जिल्ह्याला पुन्हा हवामान खात्याकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुरात चार जण वाहून गेले

पुणे जिल्ह्याला गुरूवारी पुन्हा हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. त्यामुळे जिल्ह्यात दिवसभरात ६४.५ ते ११५.५ मिलीमीटर पाऊस कोसळेल असेही स्पष्ट केले.
 
शिवाजीनगर येथील वेधशाळेत बुधवारी सकाळी साडेआठ ते गुरूवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ११२.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यापैकी ७६ मिलीमीटर पाऊस बुधवारी रात्री साडेआठ ते साडेअकरा या वेळेत झाला. त्यामुळे पुणे पावसाच्या पाण्यात अक्षरश: वेढले गेले. रात्री बारा वाजल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. रात्री साडेअकरा ते अडीच यावेळेत १५.४ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. 
 
पुण्यात दिवसभर ढगाळ वातावरण रहाणार आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने दिला. विजांचा गडगडाटासह हा पाऊस पडणार असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे आवाहनही केले आहे.
 
दुसरीकडे पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरात चार जण वाहून गेले आहेत.  दौंड तालुक्यातील राजेगावमध्ये ही घटना घडली आहे. तिघांचे मृतदेह हाती लागले असून एकाचा शोध सुरु आहे. दुचाकीवरुन जात असताना चौघे ओढ्यात वाहून गेले .
 
मिळालेल्या माहितीनुसार, हे चौघे जण दोन दुचाकीवरुन ओढ्यातून चालले होते. भिगवण येथून दौंडकडे जात असताना राजेगावच्या चोपडे वस्तीजवळील ओढ्यात ते वाहून गेले आहेत. शहाजी गंगाधर लोखंड (52), सुभाष नारायण लोंढे (48), अप्पासो हरीचंद्र धायतोंडे (55) आणि कलावती अप्पासो धयातोंडे (48) अशी त्यांची नावे आहेत. सुभाष लोंढे यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.