शनिवार, 15 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 मे 2021 (21:33 IST)

ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

Reserve separate rooms for children in rural hospitals - Deputy Chief Minister Ajit Pawar
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन शहरासह ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवा – उपमुख्यमंत्री अजित पवार
 
■ ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था बळकट करा
 
■ लहान बालकांवर उपचारासाठी शहर व ग्रामीण भागात सुविधा निर्माण करा
 
■ मृत्यू दर कमी होण्यासाठी प्रयत्न करा
 
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रमुख रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
 
पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठकीत घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.  
 
उपमुख्यमंत्री.पवार म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमधील धोका विचारात घेऊन वैद्यकीय सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये पुरेसे मनुष्यबळ, यंत्रसामग्री, लहान मुलांवरील उपचाराबाबत प्रतिबंधात्मक औषधे उपलब्ध करुन द्या. लहान मुलांसाठी रुग्णालयात स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्याबाबत कार्यवाही करा.
 
अग्निशमन यंत्रणा
जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची अग्निशमन यंत्रणा तपासून घेऊन त्रुटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. फायर ऑडिट करुन न घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
 
वाढीव बिले आकारणी
रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांकडून आकारणी करण्यात आलेल्या बिलांची तपासणी करुन वाढीव बिले आकारणाऱ्या तसेच रुग्णांसाठीच्या औषधांमध्ये गैरप्रकार करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
 
कोविड सेंटर तपासणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती
कोविड सेंटर मध्ये आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार पद्धतीचे पालन, वैद्यकीय सुविधा आदी बाबींची पाहणी व नियंत्रण यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
 
‘म्युकर मायकोसिस’ वरील औषधांचे नियंत्रण- म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव कोरोना रुग्णांमध्ये वाढत आहे. या रोगासाठीच्या औषधांच्या पुरवठ्यामध्ये गैरप्रकार होऊ नये तसेच रुग्णालयांना औषध पुरवठा सुरळीत होण्यासाठी  या औषधांचे नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे. कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांना म्युकरमायकोसीस अथवा अन्य काही लक्षणे जाणवतात का, याची माहिती दूरध्वनीवरून घेण्यात यावी, जेणेकरून वेळेत उपचार होतील.
 
लसीकरणावर भर
कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने अधिकाधिक नागरिकांना लस देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यावर भर देण्यात येत असून पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर 18 वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी प्रयत्न करण्यात येतील.
 
रुग्णदर नियंत्रणात
मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात रुग्णदर कमी असल्याचे दिसून येत आहे, ही दिलासादायक बाब आहे. तथापि, मृत्युदर नियंत्रणात येण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
 
लहान मुलांसाठी पुरेशा वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा वाढवा. ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता तसेच म्युकर मायकोसिस आजारावरील औषध पुरवठा, लहान बालकांसाठी आवश्यक उपाययोजना, वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.