बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (21:13 IST)

आमची होणारी बदनामी बंद करा अन्यथा आम्हाला आत्महत्या करावी लागेल

पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन त्याची प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझ्या मुलीचा मृत्यू का झाला हे पोलिसांच्या चौकशीतून समोर येईल. मात्र या सगळ्यात माझ्या मुलीची बदनामी होत आहे. आमची होणारी बदनामी बंद करा अन्यथा आम्हाला आत्महत्या करावी लागेल’, अशी प्रतिक्रिया पूजाची आई मंडूबाई चव्हाण यांनी दिली आहे. ‘आमची मुलगी कशी होती हे आम्हाला माहिती आहे. आमची मुलगी खूप धाडसी होती. ती आत्महत्या करु शकत नाही. तिच्या मृत्यूबाबत आम्हाला काहीच माहिती नाही. त्याचबरोबर अरुण राठोड या व्यक्तीला फक्त एकदा पूजासोबत पाहिले होते. अरुण राठोड कोण आहे त्याच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही’, असेही मंडूबाई चव्हाण म्हणाल्या आहेत.
 
‘माझी बहिण वाघिण होती. ती आत्महत्या करु शकत नाही. तिच्या आत्महत्येनंतर तिची बदनामी केली जात आहे. आमची होणारी बदनामी तात्काळ थांबवा. पूजाच्या मृत्यूपेक्षा तिची तिची जास्त बदनामी होतेय’,अशी प्रतिक्रिया पूजाची बहिण दिया चव्हाण हिने दिली आहे. ‘माझी बहिण पंकजा मुंडे प्रितम मुंडे यांच्यासोबतही फिरली आहे. त्यांच्यासोबतही तिने अनेक फोटो काढले आहेत ते फोटो का व्हायरल करत नाही’, असा प्रश्नही दिया चव्हाण हिने विचारला. ‘माझी बहिण कार्यकर्ती होती हे संपूर्ण बीडला माहिती आहे. तिचे वैयक्तिक फोटो व्हायरल करणे ही योग्य गोष्ट नाही. या प्रकरणाचा पोलीस योग्य तपास करतील त्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही’, असे पूजाची बहिण दिया चव्हाणने म्हटले आहे.
 
 ‘राजकारण करणाऱ्यांनी राजकारण करा, माझ्या मुलीची यात बदनामी करु नका. माझ्या मुलीची आणि आमच्या कुटुंबाची बदनामी थांबली नाही तर मी कोर्टात धाव घेईल आणि कोर्टासमोर जाऊन कुटुंबासोबत आत्महत्या करेल’, अशी संतप्त प्रतिक्रिया पूजाचे वडिल लहू चव्हाण यांनी दिली आहे. ‘तुम्हाला जे राजकारण करायचे आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. या सगळ्यात माझ्या मुलीचे नाव जोडू नका. आमची होणारी बदनामी बंद करावी’, अशी मागणी पूजाच्या कुटुंबियांनी केली आहे.