मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 28 मार्च 2020 (11:35 IST)

पुणे हडपसर भाजी मंडईमधील मासळी बाजार ग्राहकांविना ओस पडला

हडपसर भाजी मंडईमधील मासळी बाजार ग्राहकांविना ओस पडला होता. तर भाजी मंडईमध्येही खरेदीदारांची संख्या घटली होती. मंडईमध्ये गर्दी ओसरल्याने पालेभाज्यांसह फळभाज्यांचे दरही स्थिर होते. मागिल चार-पाच दिवसांपासूनच्या पोलिसांच्या कडक कारवाईमुळे नागरिकांची गर्दीसुद्धा कमी झाली आहे.
 
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत देशभर संचारबंदी लागू गेली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी चौकाचौकात पोलीस वाहनांची कसून तपासणी करीत आहेत, तर काहींना लाठीकाठीचा मारही खावा लागत आहे. मात्र, आज सकाळी भाजीपाला, अन्नधान्य, किराणा, फळविक्री, दूध-अंडी, औषधे वगळली आहेत. भाजीविक्रेत्यांनी गल्लोगल्ली भाजीविक्री सुरू केल्यामुळे भाजीमंडईमधील गर्दी कमी झाली आहे, तसेच रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्याकडे कोणी फिरकेनासे झाले आहे. महामार्ग, तसेच अंतर्गत रस्त्यावरही आज वाहनांची वर्दळ वाढली होती. मात्र, अनावश्यक फिरणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले.
 
किराणा माल, भाजीपाला-फळे, दूध-अंडी आणि औषधे पुरविणारी दुकाने सुरू ठेवली आहेत. त्यांच्या वाहतुकीच्या रिकाम्या आणि भरलेली वाहने, दुकानात काम करणारा कर्मचारीवर्ग आणि त्यांना सोडविण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनाही त्रास देऊ नये, असा अद्यादेश शासनाने काढला आहे.
 
अत्यावश्यक सुविधा : वैद्यकीय सेवा : सरकारी, खासगी डॉक्टर, नर्स, सिस्टर यांना आणि त्यांना ने-आण करणाऱ्यांना अडवू नये. नगरपालिका, महापालिका, हॉस्पिटल्स, कार्यालये, जिल्हा परिषद आदी ठिकाण काम करणारा सफाई कर्मचारी, पतपेढ्या, सहकारी बँका आणि राष्ट्रीयीकृत बँक कर्मचारी, सुरक्षा रक्षक वीजवितरणाशी संबंधित, पाटबंधारे विभाग, पाणीपुरवठा विभाग, साखर कारखान्यावर काम करणारा कर्मचारी वर्ग, मालक, सुपरवायझर, शेतमालक, शेतमजूर, शेती कामाशी संबंधित, त्याचबरोबर पत्रकार, फोटोग्राफर.
 
औषध बनविणाऱ्या कंपन्या, खाद्यपदार्थ बनविणाऱ्या कंपन्या, स्वच्छतेसाठी आवश्यक गोष्टी बनवणाऱ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना अडवू नये, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. बंद करण्यात आलेल्या कंपन्याच्या सुरक्षा रक्षकांनासुद्धा अडविण्यात येऊ नये.
 
इंटरनेट सुविधांशी संबंधित कर्मचारी, केबल ऑपरेटर्स, टेलिफोन कर्मचारी, आवश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी करणारे कर्मचारी, तात्काळ वैद्यकीय सेवेसाठी ये-जा करणारे वाहन, डायलेसिस पेशंट, सीरियस, ऑपरेशनसाठी न्यावयाचे पेशंट, रुग्णवाहिका, शववाहिकांना अडवू नये, असे स्पष्ट म्हटले आहे.
 
पोलिसांनी यांच्यावर कारवाई करावी
अनावश्यक फिरणारे, गर्दी करणारे, सोशल डिस्टंसिंग न पाळणारे, मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉक, कुत्र्यांना फिरायला घेऊन बाहेर फिरणारे, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, अनावश्यक दुचाकी दामटणारे यांना अडवून घरी पाठवावे, अशा सूचना पोलिसांना अद्यादेशामध्ये दिल्या आहेत.