तुमचं आणि माझं जे नातं ते फक्त फोटोपुरती मर्यादित नाही; राज ठाकरेंनी व्यक्त केली नाराजी
महानगपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुणे दौरा सुरु आहे.राज ठाकरे यांच्या दौऱ्याआगोदरच रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांनी पुण्यात बुधवारी मुक्काम केल्यानंतर गुरुवारी त्यांनी पदाधिकारी आणि पक्षातील कार्यकर्त्यांशी सवांद साधला आहे.
या दौऱ्यात त्यांनी पक्षाच्या कामाचा आढावाही यावेळी त्यांनी घेतला. कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक खंत व्यक्त केली आहे.
राज ठाकरे कार्यकर्ता मेळाव्यात म्हणाले की, पूर्वी खरंच बरं होतं. जेव्हा मला अनेक लोक भेटायचे, तेव्हा तिथले विषय सांगायचे. घरच्या काही गोष्टी सांगायचे.
मात्र आता मला जे भेटतात ते फक्त फोटो काढतात आणि निघून जातात. तुमचे आणि माझे जे नातं आहे ते फक्त फोटोपुरतं मर्यादित नाही असे पदाधिकाऱ्यांना म्हणत राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पुण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यावर असताना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत बैठकांचे आयोजन केले होते. राज ठाकरे हे स्वतः मैदानात उतरल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.