गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 2 डिसेंबर 2020 (10:42 IST)

कोरोनामुळे ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’बाबत अनिश्चितता अजूनही कायम

पुण्यातला अभिजात संगीताच्या क्षेत्रात जगभरात नावाजलेल्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’बाबत अनिश्चितता आहे. शासनाने परवानगी दिल्यानंतर महोत्सवाच्या आयोजनाबाबत विचार करण्यात येणार असल्याचे आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.
 
डिसेंबर महिना उजाडल्यानंतर संगीतप्रेमींना सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे वेध लागतात. सलग पाच दिवस कानसेन रसिकांना संगीताचा मनमुराद आनंद देत अभिजात संगीताच्या विश्वामध्ये मानदंड प्रस्थापित केलेल्या या महोत्सवावर कोरोना प्रादुर्भावाचे सावट आहे. शासनाने चित्रपटगृहे आणि नाट्यगृहांना ५० टक्के आसनक्षमतेनुसार परवानगी दिली आहे. मात्र, दरवर्षी महोत्सवाला लाभणारी दर्दी रसिकांची उपस्थिती ध्यानात घेता या महोत्सवाच्या आयोजनाबाबत एक प्रकारची अनिश्चितता आहे.
 
मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी म्हणाले, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला राज्याच्या विविध भागांतील तसेच देशातून आणि परदेशातून संगीतप्रेमी उपस्थित राहतात. स्वरमंडपात बसून संगीत श्रवण करणे ही रसिकांसाठी सुखद अनुभूती असते. ऑनलाइन माध्यमाद्वारे हा अनुभव  मिळणे शक्य नसल्यामुळे हा महोत्सव ऑनलाइन करण्याचा विचार नाही.