1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 10 नोव्हेंबर 2022 (08:14 IST)

सलूनमध्ये सात वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य

Unnatural act with seven-year-old boy in Pune salon
पुणे : केस कापण्यासाठी एका सलूनमध्ये गेलेल्या सात वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. सलूनमधील कामगारानेच हे घृणास्पद कृत्य केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या कामगाराला अटक केली आहे. सज्जन सहेआलम सलमानी (वय 20 वर्षे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलाच्या वडिलांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी कामगाराला ताब्यात घेतले आहे.
 
अधिक माहितीनुसार, संबंधित मुलाची आई सोमवारी (दि. 7) त्याला घेऊन केस कापण्यासाठी सलूनमध्ये गेली होती. मात्र सलूनमध्ये वेळ लागणार असल्याने ती महिला घरी निघून आली. याचा फायदा घेत कामगार या लहान मुलाला आतील खोलीमध्ये घेऊन गेला. तेथे त्याच्यासोबत अश्लील चाळे करुन अनैसर्गिक कृत्य केले. तसेच या गोष्टीची वाच्यता केल्यास जीवे मारु अशी धमकी देखील कामगाराने मुलाला दिली. त्यानंतर या कामगाराने मुलाचे केस कापून त्याला घरी पाठवले.
 
घडलेल्या प्रकारामुळे लहान मुलगा घाबरला होता. त्याने घरी जाऊन तातडीने सलूनमध्ये घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुलाच्या वडिलांनी विमानतळ पोलिसात संबंधित कामगाराविरोधात तक्रार दाखल केली. याची दखल घेत पोलिसांनी सज्जन सलमानी याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार (पॉक्‍सो) गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा अटक केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor