शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मार्च 2021 (07:37 IST)

होम आयसोलेशनमध्ये असताना बाहेर फिरल्यास गुन्हा दाखल होणार

होम आयसोलेशनमध्ये (गृह विलगीकरण) असलेल्या रुग्णांनी होम असोलेशन नियमांचा भंग करुन ते घराबाहेर फिरल्यास त्यांच्यावर कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पिंपरी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. संबंधित सोसायटीच्या चेअरमन यांनी या बाधीत रुग्णांवर लक्ष ठेवावे; अन्यथा संपूर्ण  सोसायटी सिल करण्यात येईल, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.
 
दुकानांमध्ये नियमापेक्षा अधिक गर्दी आढळून आल्यास तसेच कोरोना 19 प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत असलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास अशा दुकानधारकांवर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
 
मास्कचा वापर करणे,  सुरक्षित अंतर राखणे आदी नियम न पाळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी प्रशासनाला दिले. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत असलेल्या सर्व नियमांचे प्रत्येकाने तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनावश्यक गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर  संबंधित क्षेत्रीय अधिका-यामार्फत कारवाई करण्यात येईल तसेच ते दुकान तात्काळ सील केले जाईल. शिवाय त्या दुकानदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. आपल्या दुकानात गर्दी होणार नाही याची दक्षता संबंधित दुकानदाराने घ्यावी,  असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.