बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. रेल्वे बजेट 09
Written By वार्ता|

ममतांची 'लालूच' अव्यवहारीक- लालू

रेल्वेला नफ्यात आणून दाखविण्याची करामत करणारे आणि 'रेल्वे अर्थसंकल्पावर आपली 'लालू छाप' उमटवणारे माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव आज ममता बॅनर्जींनी सादर केलेल्या बजेटवर फारसे खुश असलेले दिसले नाहीत. उलट त्यांनी आपला रोषच व्यक्त केला. एक तर रेल्वेमंत्रिपदाची 'गाडी' चुकलेल्या लालूंनी ममतांच्या बजेटमधील दोष काढायची संधी सोडली नाही.

बजेटमधील योजना लोकांना 'लालूच' दाखविणार्‍या असल्या तरी त्या व्यवहारीक नाहीत, असे सांगून हे बजेट बनविण्यात बरीच गडबड करण्यात आल्याची प्रतिक्रिया त्यांन दिली. यातल्या अनेक योजना आपल्या कार्यकाळात सुरू करण्यात आल्याचे 'साच्यातले' उत्तरही त्यांनी दिले. थेट बजेटवर टीका न करताना, 'लोकांनी ठरवावे बजेट कसे आहे ते', असे ते म्हणाले.

आपल्या काळात रेल्वे नफ्यात होती. आता ममतादिदी ती तशीच ठेवतात की नाही, हे पहायचे असे सांगून २५ रूपयांचा पास, डबलडेकर गाड्या चालविणे या योजना व्यवहारीक वाटत नाहीत, असे मत व्यक्त केले. प्रवासी व मालभाड्यात वाढ करण्यात आली नाही, याकडे लक्ष वेधले असता, आपण तर हे भाडे कमी करून दाखविले होते, याची आठवण लालूंनी करून दिली.