रविवार, 25 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राज्यसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated: शनिवार, 11 जून 2022 (09:43 IST)

राज्यसभा निवडणूक निकाल: धो धो कोसळणारा पाऊस आणि क्षणाक्षणाला वाढणारी सामन्याची रंगत

facebook
एरवी राज्यसभेची निवडणूक म्हटलं तर सामान्य लोकांना फारशी उत्सुकता असण्याचं कारण नसतं पण यावेळी देवेंद्र फडणवीस विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला, या सामन्याला थेट रणांगणातच हजर असलेल्या पत्रकाराचं क्षणाक्षणाचं वृत्तांकन आणि विश्लेषण...
 
सकाळचे सहा वाजले आहेत. वेळ पहाटेची आहे. मी महाराष्ट्र विधिमंडळाच्या बाहेर बसलोय. पाऊस कोसळतोय.. आणि या भर पावसात रंगलेल्या, राज्यसभेच्या कुस्तीच्या आखाड्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चितपट केलंय.
 
राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणारी निवडणूक चुरशीची होईल हे स्पष्ट होतं. पण, शुक्रवारी सकाळी घर सोडताना असं अजिबात वाटलं नव्हतं, की, पुढचे 24 तास राज्याच्या राजकारणातील अत्यंत नाट्यमय घडामोडींचे असतील.
 
आजची पहाट मला 2019 च्या त्या दिवसाची आठवण करून देणारी आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना धोबीपछाड दिला होता आणि आजही पहाटेच फडणवीसांनी ठाकरेंना पुन्हा चितपट केलं.
 
राज्यसभेची निवडणूक उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोघांसाठी राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची होती. शह-काटशहाच्या राजकारणात दोन्ही नेत्यांनी आपलं संपूर्ण राजकीय वजन पणाला लावलं होतं.
 
राजकीय घडामोडी आणि त्यात निवडणूक म्हणजे.. मग राजकारणाचा तडका हवाच. शुक्रवारची सुरूवातही अशीच झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रत्येक उमेदवारासाठी मतांचा कोटा 44 असावा अशी मागणी लावून धनेत्यांकडून दावे-प्रतिदावे सुरू झाले. संध्याकाळी पाच वाजता मतदान सुरू होणार होतं. पण, भाजपने संध्याकाळी 7 च्या सुमारास केंद्रीय निवडणूक आयोगात तक्रार दाखल केल्याने निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व गोष्टींची तपासणी करायला सुरूवात केली. शिवसेनेने हा रडीचा डाव आहे, असा आरोप केला.
 
भाजपने यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड यांसारख्या आघाडीच्या नेत्यांवर आरोप केला होता. त्यामुळे या नेत्यांच्या छातीत धडधडायला लागलं. दिल्लीत काय सुरू आहे याचं टेन्शन आघाडीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. नेते सारखे आत-बाहेर ये-जा करताना दिसून येत होते. मीडियाशी काहीच बोलत नव्हते. कारण, निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे होता.
 
दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळ अजिबात सोडलं नव्हतं. तर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवसाचा केक विधिमंडळातच कापून सेलिब्रेशन करण्यात आलं. भाजप आमदार मोठ्या संख्यने विधिमंडळात उपस्थित होते. बाहेर गेलेले केंद्रीय मंत्री पियूष गोयलही विधिमंडळात पोहोचले. ते उमेदवारही होते. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर काही तणाव जाणवत होता.रली. त्यामुळे मुख्यमंत्री नाराज झाल्याची चर्चा होती. पण, तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन अखेर हा तिढा सोडवला.
 
नेते मंडळी पोहचू लागले, आमदार येऊ लागले. मतदान सुरू झालं आणि विधानभवनात लगबग सुरू झाली. देवेंद्र फडणवीस सकाळपासूनच विधिमंडळात ठाण मांडून बसले होते. प्रत्येक मतावर त्यांची नजर होती. तर, महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते सारखी ये-जा करताना दिसून येत होते. पण, आमची खरी नजर होती अपक्ष आमदारांवर.
 
कारण, याच आमदारांच्या भरवशावर महाविकास आघाडी आणि भाजपच्या आशा टिकलेल्या होत्या. त्यामुळे अपक्ष आमदार दिसला की त्याची प्रतिक्रिया मिळवण्यासाठी रिपोर्टर्स धावत-पळत होते.
 
सकाळी 11 च्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळात पोहोचले. आदित्य ठाकरेही येऊन-जाऊन होते. शिवसेना आमदारही नेत्यांच्या मागे घुटमळताना दिसत होते. भाजपचे आजरी असलेल्या दोन आमदारांना अॅम्ब्युलन्सने विधिमंडळात आणण्यात आलं.
 
दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची धावपळ सुरू होती. एकीकडे त्यांना अपक्षांसाठी पायघड्या घालायच्या होत्या. तर, दुसरीकडे आपल्या आमदारांनाही एकत्र ठेवायचं होतं. पण, शांतपणे सुरू असलेली ही निवडणूक काही क्षणात नाट्यमय झाली भाजपने महाविकास आघाडीच्या तीन आमदारांची मतं अवैध असल्याचा आरोप केला. आणि प्रकरण गेलं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे.
संध्याकाळी निर्णय अपेक्षित असल्याने कार्यकर्ते जमा होण्यास सुरूवात झाली. भाजप, शिवसेनेचा भगवा घेऊन कार्यकर्ते विधिमंडळाच्या बाहेर रस्त्यावर जमू लागले. त्यातच पाऊस सुरू झाला. दिल्लीतून काहीच निर्णय येताना दिसत नव्हता. अनिश्चितता वाढली त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह काही काळात मावळला.
 
एव्हाना रात्रीचे बारा वाजले असतील. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रकरण जाऊन पाच तास लोटले होते. नेते क्षणा-क्षणाला हातातील फोन चेक करत होते. दिल्लीचा निर्णय कधी येतो याची चिंता सर्वांनाच होती. अखेर रात्री एक वाजण्याच्या सुमारास दिल्लीचा निर्णय आला.
 
केंद्रीय निवडणूक आयोगाने तीनपैकी शिवसेनेच्या एका आमदाराचं मत बाद केलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश पूर्ण वाचून काढला. त्याआधी नेते कायदा काय सांगतो, याचा अभ्यास करत होते. एक मत बाद होणं, महाविकास आघाडीला हा मोठा धक्का होता. पण, दोन मतं वाचल्याचं समाधानही होतं. अखेर, सात तासांनंतर महाविकास आघाडीने सुटकेचा निश्वास टाकला आणि मतमोजणी सुरू झाली.
 
आरोप असलेल्या नेत्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून आला. पण, ज्येष्ठ नेत्यांची चिंता अजूनही दूर झालेली नव्हती. मतपेटीत मतं बंद झाली होती. आणि ती उघडल्यानंतर पुढे काय होणार हे समजणार होतं.
 
इम्रान प्रतापगढी राज्यसभा निवडणुकीतील नवं नाव. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी हार-तुरे आणून तयार ठेवले. शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्तेही हळूहळू जमू लागले होते.
 
त्यातच धो-धो पाऊस कोसळू लागला. मीडिया, पोलीस कर्मचाऱ्यांकडे छत्र्या नव्हत्या. त्यामुळे आडोशासाठी धावपळ सुरू झाली. त्याच धावपळीत नेते काय म्हणतात, काही नवीन अपडेट मिळतेय का. आतमधून काही नवीन कळतंय का..हे शोधण्याचा मी प्रयत्न करत होतो.
 
मतमोजणी सुरू झाली आणि एका तासाने निकाल आला. पहाटे तीन वाजता प्रफुल्ल पटेल, संजय राऊत आणि इम्रान प्रतापगढी निवडून आल्याची माहिती पुढे आली. पण, खरा सामना होता दोन कोल्हापुरी मल्लांमध्ये. एकापाठोपाठ एक बातम्या धडकू लागल्या. प्रत्येक माहितीसह धनंजय महाडिकांची संजय पवारांवर आघाडी निर्णयक होऊ लागली.
 
महाविकास आघाडीच्या एक-एक नेत्याने विधीमंडळाला रामराम सुरू केला. मीडियाशी जास्त न बोलता नेते मंडळी निघून जाऊ लागली. फक्त वरिष्ठ मंत्री विधिमंडळात उपस्थित होते. कॉंग्रेसचे एक वरिष्ठ मंत्री ऑफ द रेकॉर्ड म्हणाले, 'आमचा चौथा उमेदवार पडणार. महाडिक जिंकून येणार. झालंही तसंच..' अखेर महाडिक यांनी संजय पवार यांचा पराभव करून राज्यसभा गाठली.
 
धनंजय महाडिक जिंकल्यानंतर भाजपचा उत्साह मोठा वाढला. नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी सुरू केली. देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आलं. भाजप आमदारांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली होती.