शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मार्च 2023 (11:16 IST)

श्रीराम जन्माचे अभंग

कुळगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा । असती गरोदरा तुझ्या कांता ॥१॥
धर्मशास्त्र ऎसें डोहळे पुसावें । त्यांचे पुरवावे मनोरथ ॥२॥
ऎकोनियां ऎसें आनंद मानसीं । कैकयी सदनासी जाता झाला ॥३॥
मंचकी बैसली होती ते पापिणी । देखतां नयनीं पहुडली ॥४॥
सुदरपणाचा अभिमान मनीं । त्यावरी गर्भिणी नामा म्हणे ॥५॥
**************************
राजा म्हणे इच्छा तुझिये मानसीं । डोहळे मजसी सांग आतां ॥१॥
येरी म्हणे ऎसें वाटतसे जीवा । कनिष्ठासी द्यावा राज्यपट ॥२॥
ज्येष्ठासी धाडावें दुरी दिगंतरा । नये समाचारा त्याचा आम्हां ॥३॥
जनांत हें निंद्य वेदबाह्य कर्म । करितां अधर्म पाप बहु ॥४॥
माझिये मस्तकी ठेवावा हा दोष । तुम्हांकडे लेश काहीं नाहीं ॥५॥
निंदितील जन मज वाटे सुख । ऎकतांची दु :ख राया झालें ॥६॥
वृश्र्चिकाचें पेंवीं तक्षक पडत । घालिताती घृत अग्निमुखीं ॥७॥
ऎसी व्यथा होय नामा म्हणे त्यासी । उठिला त्वरेसी तेथोनियां ॥८॥
**************************
येतसे दशरथ सुमित्रामंदिरी । देखतां सामोरी येती झाली ॥१॥
न माये आनंद तियेचें मानसीं। ठेवी मस्तकासी चरणावरी ॥२॥
घालोनी आसन प्रक्षाळी चरण । सर्वांगी लेपन तीर्थोदकें ॥३॥
गंध धूप दीप पुष्पांचिया माळा । अर्पूनी तांबुला उभी राहे ॥४॥
कैकयीचें दु:ख विसरला राव । पाहोनियां भाव सुमित्रेचा ॥५॥
होती जे डोहळे तुझिये मानसीं । सांग मजपाशी पतिव्रते ॥६॥
प्राणनाथ ऎसें वाटतसें जीवा । वडिलांची सेवा अहर्निशीं ॥७॥
आवडे हे एक नावडे आणिक । द्यावें मज एक हेंचि आतां ॥८॥
ऎकतांचिअ ऎसें कांतेचें वचन । आनंदे निमग्न मन होय ॥९॥
घेऊनियां हातीं रत्‍नांचें भूषण । टाकी ओवाळून नामा म्हणे ॥१०॥
**************************
दशरथ राजा उठिला तेथूनी । कौसल्येसदनीं जाता झाला ॥१॥
पाहातसे दृष्टी तेव्हां श्रावणारी । न माये अंतरी तेज तिचे ॥२॥
तुझिये मानसी होती जे डोहाळे । सांग वो वेल्हाळे मजपासी ॥३॥
उदरांत असे भक्तांचा कैवारी । तेथें उरी देहभावा ॥४॥
सदा समाधिस्थ रामरुप झाली । कौसल्या माऊली नामा म्हणे ॥५॥
**************************
न बोलेचि कांहीं इसीं काय झालें । भूतें झडपिलें निश्र्चयेसी ॥१॥
माझिये अदृष्टीं नाहीं हा नंदन । म्हणोनियां विघ्न ओढवले ॥२॥
निवारी हें विघ्न वैकुंठनायका । रक्षीं या बाळका सुदर्शने ॥३॥
तुझा मी किंकर आजि अंबुजाक्षा । द्यावी मज भिक्षा हेंचि आतां ॥४॥
नामाचा उच्चार ऎकतांचि कानीं । नेत्र उघडोनि पाहती झाली ॥५॥
राजा म्हणे कां हो ऎसी अवस्था । कां हो भ्रम चित्ता झाला असे ॥६॥
विश्‍वाचा मी आत्मा स्वयें असे राम । मजमाजीं भ्रम कैचा असे ॥७॥
अवतार महिमा वाणी वेद माझा । सुरवरांच्या काजा नामा म्हणॆ ॥८॥
**************************
रावणे हें केलें लग्नामाजी विघ्न । असे कीं स्मरण तुजलागी ॥१॥
आणि रे धनुष्य मारीन रावणा । लंका बिभीषण देईन मी ॥२॥
अंगद सुग्रीव जांबुवंत वीरा । हनुमंत पाचारा लवकरी ॥३॥
टाकोनी पर्वत बुजवा रे सागरा । पायवाट करा जावयासी ॥४॥
लंकेपुढे मोठे माजवीन रण । तोडीन बंधन सुरवराचें ॥५॥
विश्‍वामित्र याग नेईन मी सिद्धि । मारीन कुबुद्धि दोघा जणा ॥६॥
खर दुषणाचा घेईन मी प्राण । धनुष्य मोडीन भुजाबळे ॥७॥
ध्याती मज त्यासी बहुत आवडी । न विसम्बे घडी त्यासी एक ॥८॥
बोलीला वाल्मिक तैसेंचि करीन । वर्तोनि दावीन नामा म्हणे ॥९॥
**************************
परब्रम्ह पूर्ण आलें माझे घरीं । न कळे अंतरीं नृपाचिया ॥१॥
करीती बडबड होती भूत चेष्टा । पाचारा वसिष्ठा लवकरी ॥२॥
येऊनि वसिष्ठ पाहे कौसल्येसी । नावरती तियेसी अष्टभाव ॥३॥
राजा म्हणे कैसें विपरीत झालें । वसिष्ठा झडपिलें महाभूतें ॥४॥
श्रावणवधाचें अध नाहीं जळालें । दुजें हें निर्मिलें प्रारब्धासी ॥५॥
ऎकतांचि हासे सावध होऊनि । बोलतसे झणी नामा म्हणे ॥६॥
**************************
विरंचीचा बाप क्षीरसागरवासी । ध्याती योगी त्यासी निरंतर ॥१॥
पुरेहूनिपर वैखरीहूनि दुरी । कौसल्येंचे उदरीं तोचि असे ॥२॥
बोलियेंलें जें जें नव्हे असत्य वाणी । न येऊं दे मनीं शंका कांही ॥३॥
माझें हें संचित धन्य धन्य आतां । पाहीन मी कांता लक्षुमीचा ॥४॥
धन्य धन्य धन्य अयोध्येचे लोक । वैकुंठनायक पाहतील ॥५॥
धन्य पशुपक्षी श्‍वापदें तरुवर । राजा रघुवीर पाहतील ॥६॥
त्रैलोक्यांत धन्य तूंचि एक नृपा । नामयाच्या बापा पाहशील ॥७॥
**************************
उत्तम हा चैत्रमास । ऋतु वसन्ताचा दिवस ॥१॥
शुक्लपक्षी ही नवमी । उभे सुरवर ते व्योमीं ॥२॥
मध्यान्हासी दिनकर । पळभरी होय स्थिर ॥३॥
धन्य मीच त्रिभुवनीं । माझे वंशीं चक्रपाणि ॥४॥
सुशोभित दाही दिशा । आनंद नरनारी शेषा ॥५॥
नाहीं कौसल्येसी भान । गर्भी आले नारायण ॥६॥
अयोनी सम्भव । प्रगटला हा राघव ॥७॥
नामा म्हणे डोळां । पाहीन भूवनत्रयपाळा ॥८॥