भ्रष्टाचाराचा 'मेडाफ टच'
नितिन फलटणकर
मिडास नावाच्या राजाची गोष्ट लहानपणी आपण ऐकली असेल. ज्याला हात लावेल त्याचे सोने होईल, असा त्याला वर मिळाला होता. सोन्याच्या हव्यासापोटी हा वर मिळवलेल्या या राजाची मुलगीही अखेर त्याच्याच स्पर्शाने सोन्याची होऊन जाते, अशी ही कथा. अमेरिकेतही या कथेच्या उलटी स्थिती मेडाफ नावाच्या एका बिलंदराने आणली आहे. 'मेडाफ' नावाच्या या बड्या गुंतवणुकदाराने ज्या बॅंकेला स्पर्श केला तिचे दिवाळे वाजण्याची वेळ आली. हा 'मेडाफ टच' आधीच मंदीच्या खाईत रूतलेल्या अमेरिकेला आणखी खोलवर नेणारा ठरेल अशी शक्यता दिसत आहे. अमेरिकेत आलेल्या आर्थिक मंदीने जगाला वेठीस धरले आहे. अमेरिकेतील अनेक बँकांना ताळे लागले आहे. गुंतवणूकदारांचे पैसे बुडल्याने अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. अमेरिकेच्या या सावळ्या गोंधळाला जितक्या अमेरिकी बँका जबाबदार आहेत, त्याच प्रमाणात अमेरिकी नॅसडॅकचे माजी अधिकारी आणि नॅसडॅक मार्केटचे माजी चेअरमन 70 वर्षीय बर्नाड मेडाफ यांचाही यात मोठा हातभार आहे.मेडाफ यांना अमेरिकेत अटक करण्यात आली असून, त्यांनी दाखवलेल्या हातचालाखीने अमेरिकेसह अनेक बँकांचे बारा वाजले आहेत. बर्नाड यांच्या या यादीत स्पेन, ब्रिटनमधील काही बँकांचाही समावेश आहे. मेडाफ यांनी 50 अब्ज डॉलरचा घोटाळा केला असून आतापर्यंत जगeत हा पहिलाच इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेला बँक घोटाळा आहे. सध्या मेडाफ यांना 1 कोटी डॉलरच्या जामिनावर मुक्त करण्यात आले आहे. मेडाफ यांचा घोटाळा उघड झाल्यानंतर जगभरातील बँकांमध्ये चौकशी सुरु झाली असून, मेडाफ यांच्या यादीत आपला समावेश आहे का? याचा तपास करण्याचे आदेश बँकांनी आपल्या कर्मचार्यांना दिले आहेत. मेडाफ नॅसडॅक एक्सचेंजमध्ये गुंतवणूकदारांसाठी सल्लागार कंपनी चालवत. ते या माध्यमातून कंपनी आणि शेअरधारकांमध्ये दलालीचे काम करत. या सोबतच नॅसडॅकला अंधारात ठेवत मेडाफ उद्योगांना गुंतवणूक करण्यासाठी एक सल्लागार कंपनीही चालवत. परंतु, त्यांनी ही कंपनी फारसी प्रकाशात येऊ नये याची पुरेपुर काळजी घेतली होती. या माध्यमातून ते युरोपियन गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक खोटी आश्वासनेही देत. त्यांच्या या आश्वासनांची माहिती झाल्यानंतर इन्व्हेस्टमेंट बँकेने पाच वर्षांपूर्वीच त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक टीम स्थापन केली होती. यानंतर आता कुठे या टीमला मेडाफ यांनी केलेल्या घोटाळ्याची माहिती मिळाली असून, त्यांनी यानंतर मेडाफ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. परंतु, तोपर्यंत मेडाफ यांच्या धक्क्याने जगातील अनेक बँका कोसळल्या आहेत. मेडाफ यांनी केलेल्या घोटाळ्याचा सर्वांत जास्त फटका स्पेनमधील सेनटेंडर बॅंकेला बसला आहे. यानंतर ब्रिटनमधील एबे बँक, एलायंनस् एण्ड लिस्टर, बॅडफर्ड एण्ड बिंगली आदी बँका आणि आर्थिक संस्थांना याचा जबर फटका बसला आहे. जवळपास 2.3 कोटी डॉलरपर्यंतचे नुकसान या बॅंकांना सहन करावे लागत आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतरच अमेरिकी बाजाराचे बारा वाजले आहेत. आधीच अमेरिकेत जबदरस्त आर्थिक बंदी आली आहे. या सगळ्याचा परिणाम भारतीय बाजारावर जाणवतोच आहे. परंतु, अशियाई बाजारालाही मेडाफ यांच्या या कारनाम्याने मोठा फटका बसला आहे.