जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘संवादपर्व’ प्रभावी ठरेल- तांबे
शिर्डी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित ‘संवादपर्व’ उपक्रम शासन व जनतेला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरला आहे, शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘संवादपर्व’ प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन साईबाबा संस्थावनचे विश्वस्त सचिन तांबे यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर अंतर्गत उप माहिती कार्यालय, शिर्डी आणि कालिकानगरच्या जय महाकाली मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने ‘संवादपर्व’ उपक्रमाचे आयोजन करण्यारत आले होते, त्यावेळी श्री. तांबे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नचिकेत वर्पे, माहिती अधिकारी गणेश फुंदे, कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेचे राहाता तालुका तंत्रज्ञान व्य्वस्थापक राजदत्त गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. तांबे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून देशात व राज्यात अनेक नव्या योजना साकारल्या आहेत, संपूर्ण देशासह राज्यात या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे, या योजनांचा प्रभावीपणे प्रचार होण्यासाठी संवादपर्व उपक्रमाच्या माध्यमातून शासन आपल्या दारी आले आहे. स्वच्छ भारत अभियान, मुद्रा योजना, पंतप्रधान फसल विमा योजना या केंद्र शासनाच्या योजना अत्यंत प्रभावी ठरल्यां आहेत, याचा आपण लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे.
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राज्यात अत्यंत चांगले काम झाले आहे. पाणीपातळी खालावलेली गावे जलयुक्त शिवारच्या कामानंतर पाणीदार झाली आहेत. नदी, नाले, ओढे यांचे रूंदीकरण व खोलीकरणाच्या कामामुळेच हे शक्य झाले आहे, शिर्डीतही जलसंवर्धन, स्वच्छता अभियान यात सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे, असे सांगून श्री. तांबे म्हणाले, वनविभागाच्या माध्यमातून एक कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात आला, यासोबतच शासनाच्या विविध उपक्रमात सहभागी व्हावे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने गणेशोत्सव कालावधीत जिल्ह्यात संवादपर्व हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महत्त्वाच्या शासकीय कल्याणकारी योजना, शासकीय निर्णय आणि ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा हेतू असल्याचे माहिती अधिकारी गणेश फुंदे यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नचिकेत वर्पे, कृषी विभागाचे आत्मा यंत्रणेचे राहाता तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राजदत्त गोरे यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबत सविस्तर माहिती दिली.