1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल (पुरूष) स्पर्धा

दिवस पहिला : सत्र पहिले
राजस्थान, अहमदाबाद, सूरत, उदयपूरच्या विद्यापीठांची विजयी सलामी
जळगाव, परभणी विद्यापीठांचे संघ स्पर्धेबाहेर

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुलात आजपासून सुरू झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल पुरूष गटाच्या स्पर्धेमध्ये आज बाद फेरीच्या सामन्यांत गुजरात विद्यापीठ (अहमदाबाद), राजस्थान केंद्रीय विद्यापीठ (अजमेर), वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ (सूरत), पॅसिफिक विद्यापीठ (उदयपूर) आणि मोहनलाल सुकादिया विद्यापीठ (उदयपूर) यांच्या संघांनी विजयी सलामी दिली. महाराष्ट्राच्या जळगाव आणि परभणीच्या संघांनी चुरशीची लढत देऊनही पहिल्याच दिवशी स्पर्धेबाहेर पडावे लागले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), महारामा प्रताप विद्यापीठ (उदयपूर) आणि धर्मसिंह देसाई विद्यापीठ (नाडियाद) या संघांनी उपस्थिती न दर्शविल्यामुळे अनुक्रमे चारोतार विद्यापीठ (चुंग, जि. आणंद), जनार्दन रायनगर राजस्थान विद्यापीठ (उदयपूर) आणि सरदार पटेल विद्यापीठ (वल्लभ वैद्यनगर) यांना पुढे चाल देण्यात आली.

अत्यंत चुरशीच्या लढतीत अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठाने जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २५-१९, २५-१९, १२-२५, १६-२५, १५-१० असा ३-२ ने पराभव केला. जळगावच्या संघाने अत्यंत चिवट झुंज दिली.

राजस्थान केंद्रीय विद्यापीठाने परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचा २३-२५, १४-२५, २५-१४, २५-१७, १५-१२ असा ३-२ ने पराभव केला. पिछाडीवरून जोरदार मुसंडी घेत राजस्थान विद्यापीठाने सामन्यावर वर्चस्व मिळवले आणि अखेरचे तीन सेट सलग जिंकत सामना जिंकला.

सूरतच्या वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठाच्या संघाने बिकानेरच्या महाराजा गंगासिंह विद्यापीठाचा २५-१८, २५-१०, २५-१३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. उदयपूरच्या पॅसिफिक विद्यापीठाने गांधीनगरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टीचर एज्युकेशन संघाचा २५-८, २५-१६, २५-१२ असा सहज पराभव केला तर उदयपूरच्याच मोहनलाल सुकादिया विद्यापीठानेही जयपूरच्या जयनारायण व्यास विद्यापीठाचा २५-१५, २५-२०, २५-१६ असा पराभव केला.