बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 18 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत घेतलेल्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला.  www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने निकाल जाहीर झाला आहे. यात राज्याचा एकूण निकाल 24.44, तर पुणे विभागाचा निकाल 25.41 टक्‍के निकाल लागला आहे.
 
या परीक्षेसाठी राज्यभरातून 1 लाख 25 हजार 620 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 1 लाख 24 हजार 723 विद्यार्थी परीक्षेस बसले. यातून 30 हजार 488 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्‍केवारी 24.44 इतकी आहे. एकूण 48 विषयांची ही परीक्षा घेण्यात आली होती. मागील वर्षी पुणे विभागाचा निकाल 30.93 टक्‍के लागला होता तर यंदा तो पाच टक्‍क्‍याने घसरला असून 25.41 टक्‍के झाला आहे. यंदा पुणे विभागातून या पुरवणी परीक्षेसाठी 19 हजार 546 विद्यार्थी बसले. त्यापैकी 4 हजार 966 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा नागपूर विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच 31.10 टक्‍के लागला आहे, तर सर्वात कमी 12.93 टक्‍के निकाल कोकण विभागाचा लागला आहे.
 
ज्या विद्यार्थ्यांना आपली गुणपडताळणी करायची आहे, त्यांनी 30 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरदरम्यान विभागीय मंडळाकडे अर्ज करायचा आहे. तर ज्यांना उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती हव्या आहेत, त्यांनी 30 ऑगस्ट ते 18 सप्टेंबरपर्यंत अर्ज करायचा आहे.