मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 एप्रिल 2022 (11:18 IST)

कोल्हापुरात ११ मजली इमारतींचा मार्ग मोकळा

kolhapur mahapalika
कोल्हापूर-महापालिका अग्निशमन दलाकडे अधुनिक यंत्रसामुग्री नसल्याने १५ मीटरवरील इमारतींमध्ये आपत्ती घडल्यास बचाव कार्य करण्यास मर्यादा येत होत्या. यामुळे महापालिका ११ मजल्यावरील इमारतींच्या बांधकामांना परवानगी देत नव्हती. यामुळेच बांधकाम व्यावसायिकाडून टर्न टेबल लॅडर खरेदीची मागणी जोर धरत होती. मनपानेही लॅडर खरेदीचा निर्णय घेतला. वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर तीन दिवसांत टर्न टेबल लॅडर मनपाच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होत आहे. यामुळे मुंबई, पुण्यानंतर आता कोल्हापुरातही ११ मजल्यावरील टोले जंग इमारती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे १५ मीटरवरील इमारतीत आपत्ती घडल्यास बचाव कार्य राबवता येत नव्हते. यामुळेच ११ मजल्यावरील इमारतींना महापालिकेकडून रितसर परवानगी दिली जात नव्हती. अपवादात्मक काही इमारतींना अटी आणि शर्थीने शहरात परवानगी दिली गेली आहे. यामध्ये संबंधित बांधकाम व्यावसायिकांनीच आपत्तकालिन स्थितीचा सामना करण्यासाठी ११ मजल्यावर आवश्यक सुविधा उपलब्ध ठेवण्याचे म्हटले होते. नियम व अटी पूर्ण कराव्या लागत असल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी ११ मजल्यावरील इमारती बांधण्यास अडचणी येत होत्या.
 
यामुळेच महापालिकेने राज्य शासनाकडे टर्न टेबल लॅडर खरदेसाठी प्रस्ताव पाठविला. राज्यशासनाने मात्र, १०० टक्के निधी देण्यास असमर्थता दशर्वली. अखेर राज्य शासनाने ५० टक्के राज्यशासन आणि ५० टक्के महापालिका हिस्सा अशा अटीवर निधीला मंजूरी दिली. मनपाची आर्थिक स्थिती बेताची असल्याने ५ कोटी ५० लाखांचा निधी देणे शक्य नव्हते. त्यामुळे काही दिवस टर्न टेबल लॅडर खरेदीचा विषय मागे पडला होता. बांधकाम व्यावसायिकांची शिखर संस्था असणाऱया क्रीडाईने वारंवार मागणी केल्याने अखेर मनपाने बजेटमध्ये निधीची तरतूद केली. यानंतर लॅडर खरेदीची प्रक्रियेला गती आली. जपानमधील कंपनीला लॅडर तयार करण्याचे टेंडर दिले होते. लॅडर तयार झाले असून मुंबईत दाखलही झाले आहे. कागदोपत्री प्रक्रिया केली जाणार असून तीन दिवसांत कोल्हापूरमध्ये लॅडर दाखल होईल. यामुळे ५५ मीटरवर कोणतीही आपत्ती घडल्यास मनपाला त्यावर मात करणे शक्य होणार आहे.