शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 28 जून 2022 (08:39 IST)

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात 3 वर्षीय बालकाचा मृत्यू

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अवघ्या तीन वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना कराडच्या वाखाण भागात घडली. राजवीर राहूल होवाळ (रा. जगताप वस्ती, वाखाणभाग कराड) असे हल्ल्यात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. मोकाट कुत्र्यांनी बालकाचा घेतलेल्या बळीने कराडकरांच्यातून हळहळ आणि संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या घटनेने होवाळ कुटूंबियांसह परिसराला मोठा धक्का बसला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, होवाळ कुटूंंबिय हे जगताप वस्ती परिसरात राहते. सोमवारी दुपारी राजवीर याची आई शेतात गेली होती. त्यावेळी राजवीर हा घरापासून काही अंतरावर खेळत होता. तो खेळत खेळत ज्या दिशेने शेत आहे त्या रस्त्यावरून चालत गेला. याचवेळी त्या परिसरात जमलेल्या बारा ते पंधरा मोकाट कुुत्र्यांनी राजवीर याच्यावर अचानक हल्ला चढवला. मोठमोठ्याने भुंकत कुत्र्यांच्या कळवंडीने राजवीरला फरपटत बाजूला नेले. अक्षरशः अंगावर काटा येईल अशा पद्धतीने राजवीर याच्यावर कुत्र्यांनी हल्ला चढवत त्याचा बळी घेतला. राजवीर सापडत नसल्याने त्याच्या कुटूंबियांनी शोध घेतल्यावर हा प्रकार उघडकीस आल्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अमित बाबर यांनी सांगितले.