मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (20:25 IST)

एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे सातत्याने वादात अडकणारे 7 नेते

eknath shinde
महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. कायम वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असणाऱ्या सत्तार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंना अश्लिल भाषेत शिवी देऊन नवा वाद ओढवून घेतला आहे.
 
सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर महाविकास आघाडीचे नेते चांगलेत आक्रमक झालेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सत्तार यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी तोडफोड केली.
"सुप्रिया सुळे आणि महिलांची मनं दुखावली जातील असं मी बोललो नाही. कोणत्याही महिला भगिनीला वाटत असेल तर मी खेद व्यक्त करतो ," असं म्हणत कृषीमंत्र्यांनी त्यांच्या वक्तव्यापासून घुमजाव केलं.
 
अब्दुल सत्तार शिंदे गटातील पहिले वाचाळवीर नाहीत. सत्तांतरानंतर शिंदे गटाचे अनेक मंत्री आणि नेते आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत राहिले आहेत.
 
1. कृषीमंत्री अब्दुल सत्तार
कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि वाद हे समीकरण राज्याला नवं नाही.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. बीड जिल्ह्यात पहाणी दौऱ्यावर गेले असताना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना "पाणी पित नाही? मग दारू पिता का?" असा प्रश्न विचारल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. सत्तार यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर सत्तार यांनी आपलं वक्तव्य चुकीच्या अर्थाने दाखवलं, असं म्हणत पुन्हा घुमजाव केलं.
 
त्याआधी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सचिवांना काम करत नाहीत म्हणून शिवीगाळ केली होती. "सत्तार यांना आम्ही समज देऊ," असं त्यावेळी दीपक केसरकर म्हणाले होते.
 
उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असताना अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्गात "मेरिटाइम बोर्डच्या अधिकाऱ्यांना मी काही किराणा व्यापारी वाटलो का?" असं विधान केलं होतं. त्यानंतर संतप्त किराणा व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
 
2. खासदार श्रीकांत शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खुर्चीवर बसून त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे कामकाज करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला. आपला दावा सिद्ध करण्यासाठी राष्ट्रवादीने एक फोटो जारी केला. त्यात श्रीकांत शिंदे यांच्यामागे मुख्यमंत्री असा बोर्ड होता. श्रीकांत यांच्या फोटोवरून वादाला तोंड फुटलं.
विरोधकांनी श्रीकांत शिंदेंवर 'सुपर सीएम' म्हणत टीका केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने हा फोटो ट्वीट केला होता. याला उत्तर देताना श्रीकांत शिंदेंनी, "हा फोटो वर्षा बंगल्यावरचा नाही. आमच्या खासगी निवासस्थानातील ही माझी खुर्ची आहे. मागच्या बोर्डबाबत मला कल्पना नव्हती," अशी प्रतिक्रिया दिली होती.
 
3. आमदार संतोष बांगर
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर. शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून बांगर यांच्या तोडफोडीच्या राजकारणामुळे सतत वादात अडकत आहेत.
 
ऑगस्ट महिन्यात संतोष बांगर यांनी मध्यान्न भोजन योजनेत निकृष्ठ दर्जाचं अन्न देण्याच्या आरोपावरून एका उपहारगृहाच्या व्यवस्थापकाला मारहाण केली होती. बांगर यांनी त्या व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली होती.
ऑक्टोबर महिन्यात बांगर पुन्हा चर्चेत आले. ते पिकवीमा कंपनीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. अधिकारी उपस्थित नव्हते त्यामुळे चिडलेल्या बांगर यांनी पिकवीमा कार्यालयात तोडफोड केली. एवढचं नाही संतोष बांगर यांनी पीक पंचनाम्यावरून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना धमकी दिल्यामुळे ते वादात सापडले होते.
 
गेल्याच आठवड्यात संतोष बांगर पुन्हा वादात सापडले. मंत्रालयात जात असताना त्यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप झाला. याबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती दिली नाही. पण बांगर यांनी आरोपांचा इन्कार केला. पण विरोधकांनी बांगर यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
 
4. आमदार प्रकाश सुर्वे
शिंदे गटाचे दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वक्तव्यावरूनही वाद सुरू झाला होता. कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रकाश सुर्वे यांनी उद्धव ठाकरे गटाबाबत वादग्रस्त विधान केलं होतं.
 
"कोणी कामात आडवा येत असेल तर हात तोडा. हात तोडता येत नसतील तर पाय तोडा. मी दुसऱ्या दिवशी टेबल जामीन मिळवून देतो," त्यांचं हे वक्तव्य चांगलच गाजलं. सुर्वे यांच्या विधानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर ठाकरे गटाने प्रकाश सुर्वे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.

5. आमदार सदा सरवणकर
शिंदे गटाचे दादरचे आमदार सदा सरवणकर गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान वादात सापडले होते. सरवणकर यांच्यावर उद्धव ठाकरे गटाने गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रभादेवी भागात फायरिंग केल्याचा आरोप केला.
 
त्यानंतर दादर पोलिसांनी सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याचं पिस्तूल जप्त करून पोलिसांनी चौकशी सुरू केली.
 
प्रभादेवी भागात शिंदेगट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. पोलिसांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सदा सरवणकर यांनी दोन गोळ्या फायर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
 
6. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
शिंदे गटातील आक्रमक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे गुलाबराव पाटीलही त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात.
 
काही दिवसांपूर्वी जळगावच्या एरंडोल तालुक्यात पाणी टंचाईमुळे नागरीक त्रस्त होते. नदीला आलेल्या पुरामुळे पंप बंद पडले होते. त्यावेळी बोलताना "पुरामुळे तांत्रिक पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यावर पंप बंद आहेत. मग पाणी काय आकाशातून टाकू?" असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं होतं.
 
गुलाबराव पाटील यांच्या आणखी एका वक्तव्यावर टीका झाली होती. "स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय पाहत नाही. आणि हातपाय पाहाणारा स्त्रीरोगतज्ज्ञ होऊ शकत नाही," असं ते जळगावात एका कार्यक्रमात म्हणाले होते.
डिसेंबर 2021 मध्ये गुलाबराव पाटील यांनी हेमी मालिनी यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. आपल्या मतदार संघातील रस्त्यांची तुलना त्यांनी अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांच्या गालाशी केली होती.
 
या वक्तव्यानंतर सर्व राजकीय पक्षातील महिला नेत्यांनी गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. राज्य महिला आयोगाने पाटील यांना माफी मागा किंवा कारवाईला सामोरं जा असा इशारा दिला होता.
 
उद्धव ठाकेर गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल बोलताना गुलाबराव पाटील यांची जीभ घसरली होती. त्यांनी सुषमा अंधारे यांना 'नटी' म्हटलं. त्यामुळे आक्रमक कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला होता. तर, तुमची भाषा "सरंजामी माज दाखवणारी," असं म्हणत सुषमा अंधारे यांनी पलटवार केला होता.
 
7. आरोग्यमंत्री तानाजी सावंत
शिंदे सरकारमध्ये आरोग्यमंत्रिपदाची धुरा खांद्यावर घेतलेले तानाजी सावंत त्यांच्या मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादात आले होते.
 
"दोन वर्षं आरक्षण गेल्यानंतर तुम्ही गप्प होता. आणि सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली," असं विधान सावंत यांनी केलं होतं.
 
त्यांच्या विधानावर विरोधकांनी जोरदार टीका केली. तानाजी सावंत यांनी लगेच आपली तलवार म्यान केली. "बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो. मराठा समाजाच्या भावना दुखाव्यात अशी भावना नव्हती. मी माफी मागतो," असं म्हणत त्यांनी सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला.
आरोग्यमंत्र्यांनी ससून रुग्णालयात हाफकिन माणसाकडून औषधं घ्यायचं बंद करा, असा आदेश दिला. त्यावेळी पीएकडून हाफकिन ही संस्था असल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर मंत्री तिथून निघाले,' असं एक वृत्त व्हायरल झालं होतं. सावंत यांच्या या विधानावरून त्यांच्यावर टीका झाली. त्यांनंतर "मी मूर्ख आहे का? मी डॉक्टर आहे, पीएचडी होल्डर आहे. मीडिया मुद्दाम मला टार्गेट करून दाखवत आहे. जनतेची दिशाभूल केली जात आहे," असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलं होतं.
 
तर, 2019 मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये मंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्यातल्या तिवरे धरणफुटीनंतर तानाजी सावंत यांनी, "धरण 2004 साली कार्यान्वित झालं. 15 वर्षं झाली त्यात पाणी साठतं. पण कोणतीच दुर्घटना घडली नव्हती. तिथं खेकड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. त्यातूनच गळती सुरू झाली," असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता.
 
मुख्यमंत्री वाचाळवीरांचं काय करणार?
शिंदे गटातील या वाचळवीर मंत्री आणि नेत्यांमुळे शिंदे-फडणवीस सरकार सातत्याने कोंडीत सापडतंय. सप्टेंबर महिन्यात नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेते आणि मंत्र्यांची कानउघडणी केली होती.
 
बीबीसीशी बोलताना एका कॅबिनेट मंत्र्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं, "मी जास्त बोलत नाही. तुम्ही का बोलता? असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी वाचाळवीर नेत्यांचे कान टोचले होते. पण, काही नेते आणि मंत्री अतिउत्साहाच्या नादात वाद ओढवून घेताना दिसून येत आहेत."
 
अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री नेत्यांची बैठक घेऊन त्यांना समज देणार आहेत. शिंदे गटाचे प्रवक्त दीपक केसरकर बीबीसीशी बोलताना म्हणाले, "शिंदे गटाच्या प्रवक्त्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांनी बोलावली आहे. मंत्र्यांनाही मुख्यमंत्री बैठकीला बोलावू शकतात आणि सूचना देऊ शकतात."
 
वाचाळवीरांबाबत काय म्हणाले आदित्य ठाकरे?
अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबतच्या वक्तव्यावरून आदित्य ठाकरेंनी सत्तार यांच्यावर टीका केली. सत्तार यांच्या मतदारसंघात सिल्लोडमध्ये आदित्य ठाकरे एका सभेला संबोधित करताना म्हणाले, "मंत्री असताना हे अशी वक्तव्य करतायत. यांना सत्तेचा माज किती आहे पाहा. एक, दोन नाही तीन वेळा बोलतात."
 
सत्तार यांच्या मुलींचं नाव असलेल्या टीईटी घोटाळ्यावरूनही आदित्य ठाकरेंनी टीका केली.
 
सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंची छोटा पप्पू म्हणत खिल्ली उडवली होती. त्यावर बोलताना आदित्य म्हणले, "त्यांनी मला छोटा पप्पू नाव ठेवलंय. मी ते स्वीकारतो. माझं नाव छोटा पप्पू ठेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असेल तर आजपासून माझं नाव छोटा पप्पू."

Published By- Priya Dixit