सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 जून 2022 (21:42 IST)

डॉक्टर कुटुंबातील तब्बल ९ जणांची आत्महत्या; सांगली हादरले

जिल्ह्यातील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तब्बल नऊ जणांचे मृतदेह घरात आढळून आले आहेत. या प्रकरणाची दखल घेत तातडीने पोलीस अधीक्षकांसह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेचे कारण अद्याप समोर आलेले नाही. हा आत्महत्येचा प्रकार असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस पथक घटनास्थळी कसून तपासणी करीत आहे. तर, या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.
 
डॉक्टर आणि शिक्षक व्यक्तींचे हे कुटुंब असल्याचे सांगितले जाते. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील ही घटना आहे. पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ पैकी तीन मृतदेह घरातील एकाच खोलीत सापडले आहेत. तर इतर सहा मृतदेह घराच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये होते. मृतांमध्ये चार महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. हे सामुहिक आत्महत्येचे प्रकरण असू शकते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. त्याचवेळी मृतांनी काही विषारी द्रव्य प्राशन केल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे.
 
आत्महत्या केलेल्यामध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय 52), संगीता पोपट वनमोरे (वय 48), अर्चना पोपट वनमोरे ( वय 30), शुभम पोपट वनमोरे (वय 28), माणिक यल्लाप्पा वनमोरे (वय 49), रेखा माणिक वनमोरे (वय 45), आदित्य माणिक वन (वय 15) अनिता माणिक वनमोरे (वय 28) आणि अक्काताई वनमोरे (वय 72) या नऊ जणांचा समावेश आहे.
 
म्हैसाळ इथल्या नरवाड रोड जवळ असलेल्या अंबिका नगर चौक आलगत मळ्यात डॉक्टर वनमोरे कुटुंबासह राहात होते. अंबिकानगरमध्येच या कुटुंबाचे एक तर राजधानी कॉर्नर इथं दुसरं घर आहे. सोमवारी सकाळपासून दोन्ही घराचा दरवाजा उघडा नव्हता. आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता एकाच घरात सहा जण विष घेऊन आत्महत्या केल्याचं आढळून आलं.