बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 डिसेंबर 2021 (15:02 IST)

भाजपच्या एका उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेतली, त्या उमेदवाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपचे खासदार डॉ.सुजय विखे व माजी मंत्री राम शिंदे यांनी आज सकाळी कर्जत येथे भाजपच्या एका उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेतली. मात्र, ज्या उमेदवारासाठी सभा घेतली, त्याच उमेदवाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
आमदार रोहित पवार यांनी यानिमित्ताने भाजपला जोरदार धक्का दिल्याचे मानले जात आहे.अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व भाजप यांच्यामध्ये चांगलाच संघर्ष पेटला आहे.
राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराची निवड बिनविरोध करण्यात पवार यांना यश आले आहे. त्यातच शुक्रवारी पवारांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपचे खासदार विखे व माजी मंत्री शिंदे यांनी ज्या उमेदवारासाठी सभा घेतली, त्याच उमेदवाराला पवारांनी राष्ट्रवादी पक्षात आणले आहे.
पवारांच्या या खेळीवर मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी तर ट्विट करीत रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.शिंदे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, वार्ड क्र.14 भारतीय जनता
पक्षाचे उमेदवार शिबा तारेक सय्यद यांच्या प्रचारार्थ श्री. राम शिंदे आणि खा.श्री. सुजय विखे पाटील यांची काॅर्नर सभा सकाळी 11 वाजता संपन्न झाली आणि संध्याकाळी 5 वाजता सय्यद यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. कर्जत – जामखेड चे विद्यमान आमदार यांचे हेच विकासाचे राजकारण का ?, असा प्रश्नही शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
महाविकास आघाडी सरकारकडून लोकशाहीची सारीच मूल्य पायदळी तुडवली जात आहेत. कर्जत नगरपंचायतीत धमकावून अनेकांना अर्ज मागे घ्यायला लावले. आज प्रभाग 14च्या भाजपा उमेदवार शिबा सय्यद यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला.
सकाळीच त्यांच्या प्रचारार्थ सभा झाली होती. हा सत्तेचा दहशतवाद, जनता तुम्हाला माफ करणार नाही, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.भाजपचे स्वीकृत नगरसेवक म्हणून काम केलेल्या तारेक सय्यद यांची शिबा ही मुलगी आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस
 सचिन पोटरे यांनी ही माहिती दिली. शिबा यांच्यासाठी आज सकाळी सभा झाली होती. त्या सभेला चांगला प्रतिसाद देखील मिळाला, असेही ते म्हणाले.