केंद्रीय मंत्री गडकरींना धमकीप्रकरणी कारवाई, कारागृहातील सात अधिकाऱ्यांना नोटिसा
बेळगाव : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 100 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याने धमकावल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तपास यंत्रणा जाग्या झाल्या आहेत. कारागृह प्रशासनानेही हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून सोमवारी कारागृहातील सात अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
नागपूर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात आली आहे. एकीकडे पोलीस तपास सुरू असतानाच दुसरीकडे कारागृहातील सात अधिकाऱ्यांना मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांनी कारणे दाखवा नोटीस दिल्याची माहिती मिळाली आहे. तीन दिवसांत या संपूर्ण घटनेसंबंधी माहिती देण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.
कारागृहाचे साहाय्यक अधीक्षक, चार जेलर, दोन वॉर्डन अशा एकूण सात अधिकाऱ्यांना मेमो देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्र्यांना धमकावल्याचे प्रकरण गंभीर आहे. यासाठी कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या जयेश पुजारी या कैद्याकडे मोबाईल कोठून आला? याची चौकशी करण्यात येत आहे.
जयेशला नागपूरला नेणार
उपलब्ध माहितीनुसार जयेशबरोबर कारागृहात असलेल्या काही जणांची सोमवारी नागपूर पोलिसांनी जबानी घेतली असून त्याला ताब्यात घेण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. न्यायालयाची परवानगी घेऊन त्याला चौकशीसाठी नागपूरला नेण्यात येणार आहे. जयेश पुजारीची गुन्हेगारी पार्श्वभूमीही तपासण्यात येत आहे.
कारण दाऊद इब्राहिमच्या नावे 100 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली असून खंडणीची रक्कम कर्नाटकात पोहोचविण्याची सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना करण्यात आली होती. यासाठी एक मोबाईल क्रमांकही देण्यात आला आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून कसून चौकशी करण्यात येत आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor