शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 जानेवारी 2022 (08:42 IST)

आठ तास पुरेशा दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा अन्यथा नगर जिल्ह्यातील मंत्र्यांना गावबंद करू

सिंगलफेज बंदचे धोरण मागे घ्यावे, आठ तास पुरेशा दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा अन्यथा नगर जिल्ह्यातील मंत्र्यांना गावबंद करू, असा इशारा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिला.

तालुक्यातील विजेच्या प्रश्नाबाबत महावितरण कार्यालयाच्या प्रांगणात सोमवारी करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात ते बोलत होते. कर्डिले म्हणाले, महावितरणच्या माध्यमातून सुरू असलेले वीजबंद धोरण शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे.

झोपलेल्या महाविकास आघाडी सरकारला जागे करण्याचे काम करावे लागेल, असा इशारा कर्डिले यांनी दिला. डाॅ.तनपुरे कारखान्याचे संचालक रविंद्र म्हसे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोफत वीज देण्याची घोषणा केली होती.

मात्र ही घोषणा हवेत विरली. राहुरी तालुक्यात चालू डीपी बंद केली जाते हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुदैवी ठरले आहे. प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश लांबे म्हणाले, महावितरणकडून चालू रोहित्र बंद वीज पुरवठा बंद करण्याचे धोरण जुलमी पद्धतीचे आहे.

वीजबील पठाणी वसुली पद्धत बंद करून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे काम करा अन्यथा शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा उद्रेक होईल. शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी संकटात आहेत.

त्यांना आधार देण्याऐवजी चालू रोहित्र बंद करून वीजबिल वसुलीचे अन्यायकारक धोरण अवलंबवले जात आहे. जळालेले ट्रान्सफार्मर,केबल व इतर खर्चाची कामे शेतकऱ्यांवर टाकली जात असेल तर महावितरण कशासाठी ?, असा सवाल यावेळी माजी आमदार कर्डिले यांनी उपस्थित केला.