बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जानेवारी 2018 (15:53 IST)

थ्रोबॉल खेळाडूंना न्याय देण्यासाठी अजितदादांचा पुढाकार...

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजकारण, समाजकारण यासोबतच खेळालाही खूप महत्त्व देतात. शेतीविषयक गोष्टींबद्दल त्यांची जी आपुलकी आहे तीच क्रीडा क्षेत्रातही दिसून येते. त्याचाच आज पुनःप्रत्यय आला.
 

थ्रोबॉल खेळाडूंना वैधता प्रमाणपत्र मिळावे जेणेकरून शासकीय नोकरीतील पाच टक्के आरक्षणासाठी ते अर्ज करु शकतील यासाठी दादांनी थेट क्रीडामंत्री विनोद तावडे यांना फोन लावला. तावडे यांनीही दादांना सकारात्मक प्रतिसाद देत या विषयात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. लागलीच फोन करून हा विषय थेट मंत्र्यांपर्यंत पोहोचवल्याबद्दल थ्रोबॉलच्या खेळाडूंनी दादांचे आभार मानले.

हल्लाबोल यात्रेच्या सातव्या दिवशी आज अजित पवार परभणी येथे आले. त्यावेळी गौरव क्रीडा मंडळ, परभणीचे थ्रोबॉल खेळाडूंचे शिष्टमंडळ त्यांना येऊन भेटले. विषय होता, १ जुलै २०१६ रोजी शासनाने काढलेल्या एका अजब शासन निर्णयाचा (GR). ऑलम्पिक, एशियन आणि कॉमनवेल्थ खेळाव्यतिरिक्त इतर खेळांना, खेळाडूंना वैधता प्रमाणपत्र मिळणार नाही, अशी तरतूद त्यात करण्यात आली. वैधता प्रमाणपत्र नसेल तर खेळाडू शासकीय नोकरीमध्ये असलेल्या पाच टक्के आरक्षणासाठी अर्जच करु शकणार नाहीत. मात्र अजित दादांनी तात्काळ दखल घेत या खेळाडूंना दिलासा दिला.

आघाडी सरकारच्या काळात २००५ च्या जीआरनुसार ४२ खेळांच्या खेळाडूंना शासकीय नोकरीसाठी खेळाडू वैधता प्रमाणपत्र मिळत होते. मात्र १ जुलै २०१६ च्या जीआरनुसार ४२ पैकी फक्त २८ खेळांनाच पात्र करण्यात आले आहे. वगळलेल्या खेळांमध्ये थ्रोबॉलचाही समावेश आहे. दादांना भेटून खेळांडूनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची वाच्यता केली. २०१६ पूर्वीपासून जिल्हा व राज्य स्तरावर जे खेळाडू खेळत आहेत त्यांना खेळाडू वैधता प्रमाणपत्र द्यावे, जेणेकरून शासकीय नोकरीसाठी त्यांना अर्ज करता येईल अशी मागणी त्यांनी अजित दादांकडे केली.