मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 1 जानेवारी 2022 (10:54 IST)

भीमा कोरेगाव परिसराच्या विकासाविषयी अजित पवार म्हणाले...

भीमा कोरेगाव याठिकाणी शौर्यदिनाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच विजय स्तंभाला अभिवादन केलं. महाविकास आघाडी सरकार या स्मारकाचा विकास करणार असल्याचं यावेळी अजित पवार म्हणाले.
 
अजित पवार यांच्याबरोबर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचीही यावेळी उपस्थिती होती. पहाटे 6.45 च्या सुमारास अजित पवारांनी याठिकाणी उपस्थिती लावत अभिवादन केलं.
 
याठिकाणी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणामध्ये पोलिस बंदोबस्त तसेच फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. पहाटेपासून याठिकाणी अभिवादनासाठी येणाऱ्यांची गर्दी झालेली पाहायला मिळालं.
 
दरम्यान, कोरोनाच्या पाश्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि सहकार्य करण्याचं आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केलं आहे.
 
अजित पवारांपाठोपाठ वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही 7.15 च्या सुमारास विजय स्तंभाला अभिवादन केलं. दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले तसेच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊतही याठिकाणी अभिवादनासाठी येणार आहेत.
 
स्मारक परिसराचा विकास करणार
भीमा कोरेगाव येथील पराक्रमाचा इतिहास कायम स्मरणात राहावा यासाठी या स्मारकाचा विकास करणार असल्याचं अजित पवार यांनी अभिवादनानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
 
याठिकाणी विकास करण्यासाठी गरज भासल्यास जमिनीचं अधिग्रहणही केलं जाईल. तसंच अधिकाऱ्यांची शासकीय समिती स्थापन करून याचा विकास करणार असल्याचंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी तारतम्य ठेवून वागावं, अन्यथा रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्यास सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
 
कोरोना पुन्हा एकदा खूप वेगाने पसरत आहे. त्यामुळं काही नवीन नियम करण्यात आले आहेत. राज्याला कोरानापासून मुक्त करणं हाच नवीन वर्षातला संकल्प असल्याचंही पवार यावेळी म्हणाले.
 
लोकांच्या काळजीपोटी बैलगाडा शर्यती रद्द
पुण्यातील दोन बैलगाडा शर्यती रद्द करण्याच्या निर्णयाचंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समर्थन केलं. लोकांच्या काळजीपोटीच हा निर्णय घेतल्याचं पवार म्हणाले.
 
कोरोना हे जगावर आलेलं संकट आहे. लोकांच्या जीवाशी खेळता येणार नाही. त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी बैलगाडा शर्यत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असं पवार म्हणाले.
 
अशा प्रकारचे कार्यक्रम घेताना सगळ्यांनीच काळजी घ्यावी, असंही पवार म्हणाले. रुग्णांच्या संख्या वाढण्याचं प्रमाण पाहून नियम आणखी कठोर करण्याचा निर्णय घेतला जाईल, असंही ते म्हणाले.
 
पाच दिवसांचं अधिवेशन घेऊनही या काळामध्ये 10 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली. तसंच 20 आमदारही कोरोना बाधित असल्याचं, अजित पवार यांनी सांगितलं.