1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 जानेवारी 2022 (10:48 IST)

महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट, सरकारनं जारी केल्या नवीन उपाययोजना

महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्यामुळे होम आयसोलेशनवर भर देण्याची गरज राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी व्यक्त केली आहे.
 
सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी आगामी काळात काय उपाययोजना कराव्या लागतील याचा उहापोह या पत्रात केला आहे.
 
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान रुग्णसंख्येचा वेग असाच राहिला आणि लक्षणं सौम्य स्वरुपाची असली किंवा लक्षणं नसतील तर रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहू द्यावं, असं डॉ. व्यास यांनी म्हटलं आहे.
 
"ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झपाट्याने होतो. त्यामुळे ओमिक्रॉनबाधित व्यक्ती सार्वजनिक जीवनात लोकांमध्ये मिसळणार नाही याची काळजी घ्यायला हवी. यासाठी सदैव तत्पर अशा कॉल सेंटरची आवश्यकता आहे. रुग्णांना कोरोनाच्या नव्या तसंच जुन्या व्हेरिएंटच्या लक्षणांची माहिती या कॉलसेंटरद्वारे देता येईल.
 
"या केंद्राच्या माध्यमातून ऑक्सिजनची पातळी, 6 मिनिट चालण्याची चाचणी याबाबतही रुग्णांना माहिती देता येईल", असं डॉ. व्यास यांनी लिहिलं आहे.
 
ते पुढे लिहितात, "कॉल सेंटर कोरोना डॅशबोर्डाशी संलग्न असेल तर विशिष्ट शहरात किती बेड्स उपलब्ध आहेत ते कळू शकेल. जेणेकरून आवश्यकता भासल्यास रुग्णाला विशिष्ट रुग्णालयात पाठवता येईल. कॉल सेंटर आणि रुग्णवाहिका नेटवर्कशीही जोडलेलं असावं."
 
'कोव्हिडच्या तिसऱ्या लाटेत महाराष्ट्रात जानेवारीत 2 लाख केसेस येऊ शकतील', असं राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्य़ा पत्रात म्हटलं आहे.
 
प्रदीप व्यास आपल्या पत्रात म्हणतात, "ओमिक्रॅान सौम्य आहे असं समजू नका, लस न घेतलेल्यांसाठी आणि सहव्याधी असलेल्यांसाठी हा व्हेरिएंट जीवघेणा आहे. तिसऱ्या लाटेत कोरोना संसर्ग खूप मोठा असेल आणि केसेस जास्त असतील, त्यामुळे लसीकरण मोहीम वाढवा आणि जीव वाचवा"
 
कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटनं सर्वांच्या चिंता वाढवल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ पाहायला मिळत आहे.आज मुंबई महानगर क्षेत्रात 5631 नवे रुग्ण आढळले आहेत.
 
या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं विविध प्रकारची पावलं उचलली जात आहेत. त्यानुसार राज्यात वेगवेगळे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.