शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 जानेवारी 2022 (08:05 IST)

समृद्ध महाराष्ट्र, बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, आव्हानांवर मात करुया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

थांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध राहायला हवं. कितीही आव्हानं येऊ देत. त्यावर आपण मात करूया. नव्या वर्षात हिच हिंमत बांधूया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो. त्यासाठी आरोग्यदायी संकल्प करूया, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
 
नववर्षाचे स्वागत करताना जगावर आलेल्या कोरोना संकटाचे भान राखावे. गर्दी नकोच आणि आपल्या वागण्यातून, बेफिकिरीतून संसर्ग वाढीला हातभार लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी नव वर्ष प्रारंभाच्या पूर्वसंध्येला केले आहे.
 
मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, नवे वर्ष हे आपल्याला नवनवीन संकल्पांसाठी प्रेरणा देते. अनेकजण अडथळ्यांना दूर सारून नवे संकल्प करतात. नव्या उमेदीने उभे राहतात. याच उभारीतून एक-एकजण म्हणता- म्हणता आपला समाज आणि आपण आव्हानांवर मात करण्यासाठी सज्ज होतो. हीच जिद्द बाळगून आपल्याला पुढे जायचे आहे. नवनवीन संकल्पांसाठी सिद्ध व्हायचे आहे. कितीही आव्हानं येऊ देत त्यांच्या छाताडावर उभे राहून यशाला गवसणी घालण्याची हिंमत बांधायची आहे. यातूनच आपल्याला समृद्ध महाराष्ट्र आणि पर्यायाने बलशाली भारत घडवायचा आहे. त्यासाठी आणि नवीन वर्ष आरोग्यदायी ठरेल, ते आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल याकरिता मनःपूर्वक शुभेच्छा आणि नववर्षाभिनंदन.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा
 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला 2022 या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारे नवीन वर्ष राज्यातील जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारे, महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या, संपूर्ण कोरोनामुक्तीच्या वाटेवर घेऊन जाणारे ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, मावळते 2021 वर्ष अनेक संकटांना, आव्हानांना घेऊन आले. मात्र, महाराष्ट्रवासियांची एकजूट आणि निर्धाराच्या बळावर आपण या आव्हानांचा यशस्वी मुकाबला केला. महाराष्ट्राची ही एकजूट यापुढेही कायम ठेवायची आहे. राज्य आणि देशासमोर ओमायक्रॉनचा धोका आणि कोरोना रुग्णांची वाढती संख्या हे नवीन आव्हान नववर्षाच्या सुरुवातीलाच उभे राहिले आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून आपण या संकटावर लवकरच विजय मिळवू, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
 
कृषी, उद्योग व्यापार, शिक्षण, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, सामाजिक सुधारणा अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच देशात अव्वल राहिला आहे. महाराष्ट्राचे हे अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा दृढसंकल्प करुया, असे सांगतानाच  नववर्षाचे स्वागत उत्साहाने मात्र आरोग्यभान राखत संयमाने करा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.