मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 जानेवारी 2022 (08:37 IST)

नाशिकमध्ये मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची आत्महत्या

नाशिकमधील  एका कॉलेजमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. श्री सप्तशृंगी आयुर्वेदिक महाविद्यालयात  शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
 
श्रुती सानप (२२)  असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रुती हि नाशिकमधील सप्तशृंगी आयुर्वेदिक महाविद्यालयात शिक्षण घेत होती. या महाविद्यालयात ती बीएचएमएसच्या  तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. श्रुती कॉलेजवळ असणाऱ्या वसतिगृहात राहायला होती.
 
दरम्यान काल दुपारच्या सुमारास श्रुतीची मैत्रीण पायल घाटोळ ही रूमवर गेली असता दरवाजा बंद होता. यावेळी पायल हिने आवाज देऊनही श्रुतीने दरवाजा उघडला नाही. रूममधून काहीच प्रतिसाद येत नसल्याने तिने दरवाजाच्या जाळीतून आत पाहिले असता श्रुतीने फाशी घेतल्याचे दिसून आले.
 
या घटनेची माहिती तिने शिक्षक दिनार सावंत यांना दिली. सावंत यांनी घटनास्थळी पोहचून दरवाजा तोडला. यावेळी श्रुतीने सिलिंग फॅनला ओढणीच्या साहायाने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 
घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान आत्महत्येमागील कारण अस्पष्ट असून या प्रकरणी पंचवटी पोलिसांचा तपास सुरु आहे.