सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 सप्टेंबर 2022 (21:48 IST)

अजित पवार: 'स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ की मी नाराज नाही?

ajit pawar
'दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा मुख्य फोकस हा शरद पवार पुन्हा एकदा पक्षाचे 'राष्ट्रीय अध्यक्ष' म्हणून निवडणं हा होता. पण अधिवेशन संपेपर्यंत तो फोकस अजित पवारांवर गेला आणि तेही त्यांनी न केलेल्या भाषणामुळे.
 
अजित पवारांच्या या न झालेल्या भाषणावरुन उलटसुलट चर्चा एवढी आहे की 'मी पक्षात नाराज नाही' असं स्पष्टीकरण द्यावं लागत आहे. ते देऊनही प्रश्न थांबले नाहीत तर 'स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का की मी नाराज नाही?' असंही विचारावं लागतं आहे.
 
सत्तेमध्ये असोत वा नसोत अजित पवार कायम चर्चेत असतात. केवळ चर्चेतच नाही तर प्रसिद्धीचा झोतही कायम त्यांच्यावर असतोच आणि त्यातूनच अनेकदा वादही निर्माण होतात. शिवाय स्पष्टवक्ते, फटकून वागणारे अशी प्रतिमा असणा-या अजित पवारांच्या यापूर्वी झालेल्या बंडांनंतर कायम नाराजीच्या बातम्या अधून मधून येत असतात. त्यामुळे अशा प्रकारांना अजित पवारही नवे नव्हेत.
 
पण तरीही आता पुन्हा सुरु झालेल्या त्यांच्या नाराजीच्या चर्चेमुळे अजित पवार पत्रकारांवर रागावले. उपमुख्यमंत्री पदावरून विरोधी पक्षनेते बनलेल्या अजित पवारांचं नवं राजकारण काय असेल याचे कयास सध्या बांधले जात आहेत.
 
काही काळासाठी भाजपाचे मित्र बनलेले अजित पवार आता विरोधक आहेत. विरोधकांबद्दलचा भाजपाचा केंद्रापासून सर्व राज्यांपर्यंतचा पवित्रा बघता महाराष्ट्रातलं पुढचं राजकारण काय असेल असा तो कयास आहे.
 
'राष्ट्रवादी'मध्ये अजित पवारांसोबत इतर नेत्यांची वर्चस्वाची स्पर्धा लपून राहिली नाही आहे. बहुतांशी ती मुख्य वारसदार कोण म्हणून सुप्रिया सुळेंशी असते, तर इतर पदांसाठी अनुभवाने समकालीन असणा-या पक्षातल्या अन्य नेत्यांसमवेत असते. त्यामुळे या स्पर्धेतूनही नाराजीच्या बातम्या नवनव्या निमित्तानं येतात.
 
आता निमित्त होतं दिल्लीच्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अजित पवारांचं भाषण न होण्याचं. ते पुन्हा काही नवीन भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत का असे सगळेच विचारु लागले.
 
नेमकं दिल्लीत काय झालं?
दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन होतं. त्यात शरद पवारांना पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडलं गेलं. रविवारी त्याच्या अंतिम सत्रात पवारांसह सगळ्या महत्वाच्या नेत्यांची भाषणं होती. स्वत: शरद पवारांसह प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असे नेते मंचावर हजर होते. स्वत: अजित पवारसुद्धा पूर्ण वेळ मंचावर होते.
 
अनेक नेत्यांची भाषणं झाली. सुप्रिया सुळे, जयंत पाटील असे सगळे बोललेल. पण शेवटच्या टप्प्यात शरद पवारांचं भाषण होण्याआधी अजित पवारांचं भाषण होईल असं समोर असलेल्या कार्यकर्त्यांना वाटत होतं.
 
पण अजित पवार मंचावरुन उठून खाली उतरले. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी अजित पवारांच्या नावानं घोषणा सुरु केल्या. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओसुद्धा समोर आला आहे. कार्यक्रमाचं प्रक्षेपणही होत होतं. घोषणा सुरु झाल्यावर प्रफुल्ल पटेलांनी आपल्या हातात माईक घेत अजित पवार बोलतील असं म्हटलं पण तेव्हा पवार मंचावर नव्हते.
 
मग ते 'वॉशरुमला गेले आहेत, आल्यावर बोलतील' असं पटेलांना सांगावं लागलं. शेवटी बराच काळ अजित पवार न आल्यानं शरद पवारांनी त्यांचं भाषण सुरु केलं. अजित पवारांचं भाषण अखेरीस झालंच नाही.
 
त्यामुळे लगेचच अजित पवार नाराज आहेत का यापसून ते त्यांना डावललं गेलं का याच्या चर्चा तात्काळ सुरु झाल्या. विधानसभेतले विरोधी पक्षनेते असलेले आणि 'राष्ट्रवादी'कडून कायम मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असलेले पक्षातले क्रमांक दोनचे नेते असलेले अजित पवार राष्ट्रीय अधिवेशनात बोलले नाहीत ही गोष्ट अनेकांना आश्चर्य वाटण्यासारखी होती.
 
त्यांच्याअगोदर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बोलण्यास सांगितल्यानं अजित पवार नाराज झाले का असाही प्रश्न विचारला गेला.
 
महाविकास आघाडी सरकार गेल्यावर विरोधी पक्षनेतेपदासाठी पाटील आणि पवार, दोघांचीही नावं चर्चेत होती. पण या तात्कालिक कारणापासून एकंदरितच अजित पवार पक्षात नाराज आहेत का अशा शंका उपस्थित केल्या गेल्या. त्या शंका तोपर्यंत महाराष्ट्रात चर्चिल्या गेल्या जोपर्यंत अजित पवारांनी आज (12 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला नाही.
 
'मी वॉशरुमला पण जायचं नाही का?'
पण अजित पवारांनी या सगळ्या चर्चा व्यर्थ आहेत असं म्हटलं. त्यांना मुंबईत पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं. त्यांनी आपण कुठल्याही प्रकारे नाराज नसल्याचं वारंवार सांगत आपण भाषण न केल्याची आणि मंचावरुन खाली गेल्याची अनेक कारणं सांगितली. आपल्या या कृतीचा विपर्यास केल्याचं पवारांचं म्हणणं आहे.
 
अजित पवारांचं पहिलं कारण आहे की त्यांनी कधीच राष्ट्रीय अधिवेशनात पूर्वी भाषण केलं नाही.
 
"राष्ट्रवादी कॉंग्रेसचं दोन दिवसांचं अधिवेशन होतं. शरद पवार आणि वरिष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केलं. राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय नेत्यांनी बोलणं अपेक्षित असतं. 1999 पासून मी या अधिवेशनात उपस्थित राहतो, पण बोलत नाही," असं अजित पवार म्हणाले.
 
पण तिथं राष्ट्रीय नेते बोलतात असं म्हणतांना अजित पवारांचा रोख कुठे आहे? काही काळापूर्वी जेव्हा महाराष्ट्रात सत्तांतरनाट्य सुरु असतांना पत्रकारांनी यामागे भाजपाचा हात आहे का असं अजित पवारांना विचारलं होतं. पण 'आत्ता मला तसं दिसत नाही असं' ते उत्तरादाखल म्हणाले होते.
 
त्यानंतर थोड्याच वेळात शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांना अजित पवारांच्या उत्तराबद्दल सांगितलं गेलं तेव्हा 'ते राज्यातले नेते आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर काय चालू आहे हे मला माहीत आहे' अशा आशयाचं उत्तर शरद पवारांनी दिलं होतं.
 
अजित पवारांचं दुसरं कारण आहे की ते वॉशरुमला गेले होते. "मी वॉशरुमला गेलो तर माध्यमांनी नेहमीप्रमाणे अर्थ काढला. माझ्याबद्दल वेगवेगळ्या बातम्या दाखवल्या. अरे, मी वॉशरुमला पण जायचं नाही का?" अजित पवारांनी उद्विग्नतेनं विचारलं.
 
पवारांनी एक कारण असंही सांगितलं की वेळ कमी होता आणि अनेकांची ठरलेली भाषणं झाली नाहीत. त्यामुळे त्यांनीही असंच ठरवलं.
 
"वास्तविक तिथं मला कोणी मला बोलू नका असंही सांगितलं नाही. मीच माझी भूमिका तिथं घेतली. आणि मी एकटाच बोललो नाही असं नाही. सुनिल तटकरे, वंदना चव्हाण हेही वेळेअभावी बोलू शकले नाहीत. मी तिथं मराठी माध्यमांशीही बोलून काय झालं हे सांगितलं. तरीही बातम्या आल्या," अजित पवार म्हणाले.
 
एकंदरित त्याचं म्हणणं हे आहे की, ते अजिबात नाराज नाहीत आणि तसं असण्याचं काही कारणही नाही.
 
"मी कशाला नाराज होऊ? पक्षानं मला उपमुख्यमंत्री केलं. मी का नाराज होऊ. जर सकाळी दहा वाजल्यापासून एका ठिकाणी बसलो तर दीड-दोन वाजता वॉशरुमला जायचं नाही का? कार्यकर्ते नाराज नाहीत. मी काय सांगायचं ते सांगितलं कार्यकर्त्यांना. मला पक्षानं कुठंही डावललं नाही," पवार म्हणाले.
 
'अजित पवारांचं भाषण कार्यक्रमात नसणं हे न समजण्यासारखं'
'राष्ट्रवादी'चं आणि अजित पवारांचं राजकारण अनेक वर्षं जवळून पाहणारे राजकीय पत्रकार संजय जोग यांच्या मते अजित पवार आता तरी कोणतीही वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत नाहीत. पण ज्या प्रकारे हे सगळं व्यवस्थापन त्या कार्यक्रमात झालं त्यातल्या काही कमतरतेमुळे हा गोंधळ झाला आणि त्यातनं झालेल्या बातम्यांनी राष्ट्रवादी आणि अजित पवारांना फटका बसला.
 
"मला वाटतं हा वाद कपोलकल्पित आहे. पण तो ज्याप्रकारे हाताळला गेला त्यामुळे परसेप्शन वॉरमध्ये राष्ट्रवादी हारली," जोग म्हणतात.
 
"माझ्या माहितीप्रमाणे अजित पवार यावेळेस बोलणारच नव्हते. ठरलेल्यांमध्ये जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष म्हणून बोलणार होते. पण ही चर्चा सुरु झाली आणि वाढत गेली. त्याला कारण हे आहेच की राष्ट्रवादीतला शरद पवारांचा वारसदार कोण हा प्रश्न अद्याप सुटला नाही आहे.
 
ते अजित पवार आहेत की सुप्रिया सुळे की अनेकदा संधी हुकलेले जयंत पाटील हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. पण कालचा प्रसंग असा नव्हता. त्यात कोणाला महत्व दिलं आणि कोणाला डावललं असं नव्हतं," जोग म्हणतात.
 
"पण एक नक्की झालं की कालच्या या प्रसंगावरुन अजित पवारांचा पक्षातला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला. सगळे ज्याप्रमाणे त्यांना समजावायला गेले, कार्यकर्ते घोषणा देत होते वगैरे पाहून. अजित पवारांना आता वेगळी भूमिका घ्यायची असेल असं वाटत नाही.
 
ती त्यांनी एकदा घेतली आहे भाजपासोबतच्या सरकारवेळी. पण आता जेव्हा राष्ट्रवादी विस्ताराची भूमिका घेते आहे, ते स्वत: विरोधी पक्षनेते आहेत तेव्हा अजित पवार अशी पक्षविघातक भूमिका घेतील असं मला वाटत नाही. म्हणूनच त्यांनी आज लगेचच खुलासा केला आणि सगळं स्पष्ट सांगितलं," असं संजय जोग यांना वाटतं.
 
पण राजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांना वाटतं की, अजित पवार नाराज आहेत हे काही लपलेलं नाही आणि पक्षांतर्गत स्पर्धेपासून अनेक कारणं त्यामागे आहेत.
 
"ते नाराज आहे हे नक्की आहे. एक तर त्यांना गेल्या वेळेस बंडाचा आकडा जमवता आला नाही, हे त्यांच्या मनात असेलच. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीचा अर्थ बंडाच्या चष्म्यातून लावला जाईलच. त्यांची प्रत्येक छोटी गोष्ट पाहिली जाते," नानिवडेकर म्हणतात.
 
पण अजून एक प्रश्न त्या उपस्थित करतात. "जी व्यक्ती मोठा काळ उपमुख्यमंत्री राहिली आहे आणि सध्या विरोधी पक्षनेता आहे, त्यांचं भाषण या अधिवेशनात नसणं हे न कळण्यासारखं आहे. असं राष्ट्रवादीनं ठरवण्यामागे काय कारण असावं हे शोधलं पाहिजे. एक नक्की आहे की शरद पवारांनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा लोकप्रिय नेता अजित पवारच आहेत. पण तरीही ठरलेल्या कार्यक्रमात त्यांचं भाषण का नसावं हे समजत नाही," नानिवडेकर म्हणतात.
 
अजित पवारांच्या नाराजीचा इतिहास
अजित पवारांबद्दल त्यांचे पाठीराखे नेहमी ते स्पष्टवक्ते आहेत आणि भावनिक पण आहेत असं सांगत असतात. त्यांच्या नाराजीच्या भावनेचा प्रत्यय यापूर्वीही अनेकदा आला आहे. अनेकदा अशा भावनेतून त्यांनी टोकाचे निर्णय घेतले आहेत.
 
जेव्हा आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री होते तेव्हा त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले. त्यानं व्यथित, नाराज होऊन त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यावेळेस पक्षातले नेतेही अचंबित झाले होते.
 
2019 च्या विधानसभा निवडणुकीअगोदर त्यांनी अचानक त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यावेळेस अनेक अंतर्गत वाद सुरु होते. निवडणुकीनंतर जेव्हा शिवसेनेसोबत महाविकास आघाडीचं सरकार प्रत्यक्षात येणं जेव्हा नक्की झालं तेव्हा अचानक अजित पवारांचं बंड झालं आणि त्यांनी भाजपासोबत 80 तासांचं अयशस्वी सरकार स्थापन केलं.
 
असं म्हटलं जातं की अशी भाजपासोबत जावं या राष्ट्रवादीतल्या काहींच्या मताचे ते होते आणि तसं होत नाही म्हटल्यावर नाराज होऊन त्यांनी बंडाचं पाऊल उचललं.
 
राष्ट्रवादीमध्ये सुप्रिया ताई आणि अजित दादा असे गट आहेत हे कायम म्हटलं जातं. त्या स्पर्धेतूनही पक्षांतर्गत असे प्रसंग घडले आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही नेतृत्वाच्या स्पर्धेतलं एक नाव आहे. या वर्चस्वाचा भावनेतून नाराजी नाट्य तर नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात कायम असते. जे दिल्लीत घडलं ते गंभीर नाराजी नाट्य होतं किंवा नव्हतं यासाठी आता राष्ट्रवादीतल्या पुढच्या घडामोडींवर सगळ्यांचं बारीक लक्ष असेल.